बांधकाम कामगारांना आवश्‍यक किराणा मोफत

क्रेडाई पुणे मेट्रोकडून मदतीचा हात; 10 हजार बांधकाम कामगारांना मदत

पुणे – कोराना विषाणूच्या संसर्गाने राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. अशा वेळी शहरात विविध बांधकाम साईट्‌सवर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांदेखील अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच बांधकाम कामगारांच्या मदतीसाठी आता क्रेडाई पुणे मेट्रो पुढे सरसावली आहे.

या अंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील विविध बांधकाम साईट्‌सवर काम करणाऱ्या कामगारांना येत्या 31 मार्चपर्यंत आवश्‍यक किराणा मोफत पुरवण्यात येणार असल्याची माहिती “क्रेडाई’ पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी कळवली आहे.

सद्य परिस्थितीत बांधकाम कामगारांना शक्‍य ती मदत करण्याची आमची भूमिका आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या 31 मार्च पर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कामगारांना आम्ही मोफत किराणा देत आहोत, असे मर्चंट यांनी सांगितले.

यासाठी क्रेडाई पुणे मेट्रोने सध्य स्थितीला 25 लाख रुपयांची खास तरतूद केली असून, “आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचे सहकार्याने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. याचा फायदा पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल 200 बांधकाम साईट्‌सवरील सुमारे 10 हजार बांधकाम कामगारांना होईल, अशी अपेक्षा मर्चंट यांनी व्यक्त केली. क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने कार्यकारिणी सदस्य असलेले अखिल अग्रवाल आणि आदित्य जावडेकर या उपक्रमाचे संयोजन करणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.