नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जनतेचा जाहीरनामा सादर करण्याचा संकल्प कॉंग्रेसने केला आहे. त्यातून त्या पक्षाने जाहीरनामा बनवण्यासाठी थेट जनतेकडून सूचना मागवल्या आहेत.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष पी.चिदंबरम यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या संकल्पाविषयीची माहिती दिली.
जाहीरनामा बनवताना देशातील जनतेला सामावून घेण्याची आमची इच्छा आहे. सर्वच क्षेत्रांशी निगडीत जनतेच्या सूचना आम्हाला अपेक्षित आहेत, असे त्यांनी नमूद केले.
जनतेच्या सूचना स्वीकारण्यासाठी कॉंग्रेसने वेबसाईट आणि ई-मेल आयडी जारी केले आहेत. आवाज भारत की या नावाने वेबसाईट, ई-मेल आयडी उपलब्ध करण्यात आले आहेत.
आपल्या जाहीरनाम्यात जनतेच्या आवाजाचे प्रतिबिंब उमटावे असा कॉंग्रेसचा मानस आहे. सूचना स्वीकारण्यासाठी पक्ष प्रत्यक्षात जनसंवादही साधणार आहे. तशा प्रकारचा किमान एक कार्यक्रम प्रत्येक राज्यात आयोजित करण्याची त्या पक्षाची योजना आहे.
निवडणुकीआधी जनतेपर्यंत पोहचण्यासाठी कॉंग्रेसने दुसरी यात्रा सुरू केली आहे. आता मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्या पक्षाने जनतेचा जाहीरनामा बनवण्याची तयारी सुरू केली आहे.