मुंबई – मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी सुरज चव्हाण यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
सूरज चव्हाण हे ठाकरे गटाचे सचिव आहेत, तसेच ते आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक राहिले आहेत. आदित्य ठाकरे यांची पडद्यामागची रणनीती सूरज चव्हाण ठरवायचे. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, महापालिका निवडणूक आणि विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकीचा त्यांचा बारीक आकडेवारीसह अभ्यास आहे.
मुंबई पालिकेचा करोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई पालिकेचा 100 कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे. गरिब मायग्रेन कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता.
केंद्र सरकारचेही त्याला समर्थन होते. या मायग्रेन कामगारांना खिचडी देण्याचे कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई पालिकेने दिले होते. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असे मुंबई पालिकेचे म्हणणे आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीच चौकशी सुरू आहे.