नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी महिला आरक्षणावरून विरोधकांवर आणि विशेषत: कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली. संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आल्याने देशभरातील जनता खुष आहे.
विधेयक मांडण्याचे पाऊल महिलांच्या सशक्तीकरणाप्रती मोदी सरकारची असणारी वचनबद्धता दर्शवते. दुर्दैवाने, विरोधकांना ते पचवणे जड जात आहे. त्याहून लज्जास्पद बाब म्हणजे प्रतिकात्मक भूमिका घेण्याशिवाय कॉंग्रेस पक्ष कधीच महिला आरक्षणाबाबत गंभीर नव्हता.
एकतर, कॉंग्रेसने कायदा रद्दबातल होऊ दिला किंवा कॉंग्रेसच्या मित्रपक्षांनी विधेयक रोखले. श्रेय घेण्यासाठी कुठलेही स्टंट केले तरी विरोधकांचा दुटप्पीपणा कधीच लपून राहणार नाही, अशी टिप्पणी शहा यांनी सोशल मीडियावरून केली.