नवी दिल्ली – आज एकीकडे कॉंग्रेसने महागाईच्या विरोधात मोठी रॅली काढली असली तरी कॉंग्रेस पक्षातील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. जी 23 गटातील नेत्यांकडून पक्षावर शरसंधान सुरूच असताना आणि काही नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला असताना आणि अभिनेते आणि माजी खासदार राज बब्बर यांनीही कॉंग्रेसशी विसंगत भूमिका घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे.
आपल्या ट्वीटमध्ये राज बब्बर यांनी पंतप्रधान जनधन योजनेचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, “या योजनेने 8 वर्षे पूर्ण केली आहेत. पैसे आणि मदत विना अडथळ्याची लोकांपर्यंत पोहोचते आहे ही एक क्रांतीच आहे. योजनेतील निम्मेपेक्षा जास्त खातेधारक महिलाच आहेत. आप का पैसा आपके हाथ या नावाने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही अशी योजना सुरू केली होती. मात्र सध्याच्या सरकारची अमंलबजावणी निश्चितच उजवी आहे.”|
पीएम जन धन योजना PMJDY ने 8 साल पूरे कर लिए। लोगों तक पैसा और मदद सीधे बिना किसी के दख़ल के पहुंचे ये क्रांति है। आधी से ज़्यादा अकॉउंट धारक महिलाएं हैं।
ऐसी योजना ‘आपका पैसा आपके हाथ’ के नाम पर मनमोहन सरकार में भी शुरू हुई थी। मौजूदा सरकार ने कार्यन्वयन यक़ीनन बेहतर किया।
— Raj Babbar (@RajBabbar23) September 3, 2022
उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसचा अल्पसंख्य समुदायाचा चेहरा म्हणून राज बब्बर ओळखले जातात. तसेच जी 23 अर्थात असंतुष्ट नेत्यांच्या गटातही त्यांचा समावेश आहे. मात्र गेल्या काही काळापासून ते राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. आता अचानक त्यांनी मोदी यांची प्रशंसा केल्यामुळे भुवया उंचावल्या जात आहेत.
आझाद यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त केल्यामुळे त्याच्या टायमिंगबद्दल शंका घेतली जाते आहे. राज बब्बर यांनी गांधी घराण्यावर थेट निशाणा साधला नसला तरी आता राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये ज्यांचा समावेश आहे त्यांना मोदींची प्रशंसा मानवणार नाही असे उत्तर प्रदेशातील पक्षाच्याच सूत्रांचे म्हणणे आहे.