पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र मध्ये वेगवेगळे टप्प्यांमध्ये महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेत आहे .29 एप्रिल रोजी पुण्यातील टिळक रस्त्यावरील स.प.महाविद्यालय याठिकाणी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामती ,पुणे ,शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघासाठी सदर जाहीर सभा घेऊन प्रचार करणार आहेत. या अनुषंगाने पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे.
नरेंद्र मोदी हे पुणे विमानतळावरून सभास्थळी कारने जाणार आहे. याकरीता सोमवारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन आणि टिळक रस्ता येथे पाहणी करत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याशी चर्चा देखील केली.
स.प . महाविद्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने वाहतूक कोंडी सारखे प्रकार टाळण्यासाठी विविध ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. सदर सभास्थळ परिसरातील वाहतूक देखील वळवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तयारी सुरू केली असून सभेस येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सभेच्या आजूबाजूच्या इमारतीतील सर्व संशयित गोष्टींची तपासणी करण्यात येईल. पोलिसांनी सभेकरिता 5 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त तयार करण्याचे नियोजन केले आहे.
त्याचप्रमाणे केंद्रीय पॅरा मिलिटरी फोर्स आणि राज्य राखीव दल यांच्या पाच कंपन्या देखील सभे ठिकाणी नेमण्यात येणार आहेत. याच सोबत बॉम्ब नाशक पथक देखील मैदानाच्या परिसरातील तपासणी करणार आहे