कराची – लंडनमधून चोरीला गेलेली बेन्टले मलसेन ही आलिशान कार थेट कराचीमध्ये सापडली आहे. शनिवारी घातलेल्या छाप्यादरम्यान ही कार कराचीमध्ये सापडली आहे. (Bentley car stolen from London was found in Pakistan’s Karachi) “कलेक्टोरेट ऑफ कस्टम्स एन्पोर्समेंट’ने याबाबतची माहिती दिली आहे. ही आलिशान कार लंडनमधून चोरीला गेल्यानंतर पाकिस्तानमध्ये असल्याची माहिती ब्रिटनमधील गुप्तचरांना समजली होती. त्यांनी ही माहिती पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना कळवली होती. ही कार कराचीतील “डिफेन्स हाऊसिंग ऍथोरिटी’मध्ये पार्क केल्याचे पाकिस्तानच्या महसूल विभागाच्या सीमाशुल्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले होते.
त्यानुसार सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये ही कार संरक्षण विभागाच्या रहिवासी भागात पार्क केलेली आढळून आली. (Bentley car stolen from London was found in Pakistan’s Karachi) तेथून ही कार ताब्यात घेण्यात आली. जमील शफी आणि नवीद बिलवानी या दोन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले आहे, असे सीमाशुल्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणातील तिसरा संशयित नाविद यामिन हा कराचीतील वाहन नोंदणी कार्यालयातील कर्मचारी असून तो सध्या बेपत्ता आहे. तर या संदर्भातील वित्तपुरवठादार आणि चारीला प्रोत्साहन देणाऱ्यांची ओळख चौकशीदरम्यान निष्पन्न होईल, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
कार पाकिस्तानात आणली कशी ?
बेन्टले कार पाकिस्तानमध्ये आयात केली गेली तेंव्हा तिची किंमत 41.43 दशलक्ष रुपये दाखवण्यात आली होती. मात्र ही कार पाकिस्तानात आणण्यासाठी परदेश मंत्रालयाची परवानगी मिळवण्यात आलेली नव्हती. त्यासाठीचे परदेश मंत्रालयाचे “ना हरकत’ प्रमाणपत्रही सादर करण्यात आले नव्हते. छापा घातला तेंव्हा या कारवर पाकिस्तानी नंबर प्लेट लावण्यात आली होती. मात्र चासी नंबर चारीला गेलेल्या कारशी जुळणारी होती. ही कार कराचीमध्ये कशी आणली गेली याचा आता शोध घेतला जात आहे. बनावट कागदपत्रांद्वारे ही कार जहाजातून आणली गेली असावी, असा संशय आहे.