जिल्हा रुग्णालयाला एचआयव्ही बाधितांच्या आरोग्याची चिंता 

नगर  -देशात लॉकडाऊन असल्याने वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्याचा बहुतांश सेवा-सुविधांवर आता ताण येऊ पाहत आहे. अशावेळी प्रतिकारशक्ती अत्यंत कमी असलेल्या एचआयव्ही बाधित रुग्णांना औषधे मिळवून देण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील एचआयव्ही कक्षाची तारेवरची कसरत सुरु आहे. नगर जिल्हा व जिल्ह्याबाहेरून आलेल्या तब्बल 9 हजार 792 एचआयव्ही बाधित रुग्णांवर येथे उपचार सुरु आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कक्षासह प्रवरा लोणी येथील केंद्रात या बाधितांवर उपचार सुरु आहेत. लॉकडाऊनच्या काळातील अडचणींमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाने या रुग्णांची प्रथम तालुकानिहाय यादी तयार केली. त्यातील विधवा, लहान मुले किंवा ज्येष्ठांना थेट घरपोच औषधे देण्याचा उपक्रम राबविला.

अन्य रुग्णांसाठी यादीनुसार औषधे प्रत्येक तालुक्‍यातील एआरटी केंदांकडे पाठविण्यात आली. तेथून त्यांना औषधे देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातील सूत्रांनी दिली. नगर जिल्ह्यातील जे रुग्ण पुणे किंवा मुंबईत उपचार घेत होते. त्यांची मोठी अडचण तयार झाली होती. त्यांना पुणे किंवा मुंबईतून औषधे उपलब्ध करुन देताना यंत्रणेची दमछाक झाली.

एचआयव्ही बाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना करोनासारख्या संधीसाधू आजारांची सामान्य माणसांच्या तुलनेत त्वरेने लागण होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाने त्या रुग्णांचा अन्य कोणत्याही रुग्णांशी संपर्क येणार नाही, याची काळजी जिल्हा रुग्णालयातील कक्षातर्फे विभागप्रमुख डॉ. विक्रम पानसंबळ यांनी घेतली. जिल्ह्यात तेराही तालुक्‍यांच्या मुख्यालयात त्यासाठी केंद्र उघडण्यात आलेले आहे.

एचआयव्ही संसर्गित रुग्णांना नियमित उपचार घेणे आवश्‍यक असते. त्याचप्रमाणे त्यांना करोनाच्या पार्श्‍वभूमीवर संधीसाधू आजार होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. प्रत्येक रुग्णास उपचार देण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पथक चांगल्या प्रकारे काम आहे. जिल्ह्यातील रुग्णांकरिता आवश्‍यक असलेला औषधसाठा पुणे, मुंबई तसेच औरंगाबाद येथून उपलब्ध केला आहे. त्यांच्यासाठीच्या औषधांचा पुरेसा साठा येथे उपलब्ध आहे.

डॉ. प्रदीप मुरंबीकर , जिल्हा शल्याचिकित्सक, अहमदनगर.  

Leave A Reply

Your email address will not be published.