वडूजमध्ये लाच घेताना मंडलाधिकारी जाळ्यात

सातारा -बॅंकेच्या कर्जाचा बोजा साताबारा उताऱ्यावर चढविण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना वडूज (ता. खटाव) येथील मंडलाधिकारी राजेंद्र मारुती जगताप (रा. तलाठी कॉलनी, गोडोली, सातारा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खटाव तालुक्‍यातील एका गावातील शेतकऱ्याने मुलाच्या शिक्षणासाठी एका बॅंकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, त्या कर्जासाठी तारण दिलेल्या जमिनीच्या उताऱ्यावर बोजा चढवल्यानंतर कर्जाची रक्कम संबंधित शेतकऱ्याला मिळणार होती. त्यामुळे त्याने सातबारा उताऱ्यावर कर्जाची नोंद करून घेण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केला होता. हा अर्ज पुढील नोंदीसाठी मंडलाधिकारी जगताप याच्याकडे आला.

मंडलाधिकारी जगताप याने या नोंदीसाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याबाबत संबंधित शेतकऱ्याने सातारा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश जगताप यांनी वडूज परिसरात सापळा लावला. तेथे तक्रारदाराकडून तडजोडी अंती  तीन हजार रुपयांची लाच घेताना मंडलाधिकारी राजेंद्र जगताप याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण, सातारचे उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.