पोलिसांत परस्परविरोधी तक्रार; प्रबळ इच्छुकांचे कार्यकर्ते आमने-सामने
तळेगाव दाभाडे – अनंत चतुर्दशीनंतर राज्यात कधीही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल, अशी राजकीय स्थिती असताना मावळातील राजकारण चांगलेच तापले आहे. कामगार राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके या भाजपच्या प्रबळ इच्छुकांचे कार्यकर्ते आमने-सामने उभे ठाकले आहेत.
या घटनेनंतर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, किरकोळ कारणावरून दोन नेत्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादावादीचे पर्यवसन तुंबळ हाणामारीत झाले. मारहाणीत सुनील शेळके यांचे कार्यकर्ते कल्पेश मराठे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वराळे फाटा (ता. मावळ) येथे मोटारीतून आलेल्या 10 ते 11 कार्यकर्त्यांनी माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या एका कार्यकर्त्याला गुरुवारी (दि. 5) रात्री साडेआठच्या सुमारास बेदम मारहाण केली. त्यात तो कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत सोमटाणे फाटा येथील खासगी रुग्णालयासमोर सोडून पसार झाले. कल्पेश अरुण मराठे (वय 29, रा. वराळे, ता. मावळ) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. कल्पेश मराठे यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्पेश मराठे हे शिवकॉलनी वराळे फाटा येथील बालाजी मित्र मंडळात गणपतीची आरती घेऊन मित्रांशी चर्चा करत बसले होते. त्यावेळी एक मोटार दोन ते तीन दुचाकीवरून आरोपी प्रतीक नारायण भेगडे, अनिकेत अशोक भेगडे, संदीप भेगडे, बिल्लू उर्फ अजय भेगडे, आविष्कार भेगडे व इतर 5 ते 6 जण हातात दंडके, लोखंडी पाईप व गज घेऊन आले. “तुला काय माज आलाय का ? तू सुनील शेळकेच्या मागेमागे फिरतोस, तुझ्या आई-बापाला जाळून टाकीन’ असे म्हणून त्यांनी कल्पेश मराठे यांना गाडीत घालून पळवून नेले.
तसेच हातातील दंडके, लोखंडी पाईप व गजाने मराठे याच्या पायावर, पाठीवर हातावर मारहाण केली. त्यात दोन्ही पाय, एक हात गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर कल्पेश मराठे याला सोमटाणे फाटा परिसरात जखमी अवस्थेत सोडून निघून गेले. त्याच्यावर सोमाटणे फाटा येथील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
दुसरी फिर्याद प्रतीक नारायण भेगडे (वय 24, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी दिली. प्रतीक भेगडे आणि अनिकेत अशोक भेगडे हे तळेगाव दाभाडे येथून मोटारीतून मंगरूळ येथे निघाले होते. त्यांची मोटार वराळे फाटा, शिव कॉलनी येथे आली. त्यावेळी रस्त्यातील खड्ड्यात साचलेले पावसाचे पाणी कल्पेश मराठे यांच्या अंगावर उडाले. त्यानंतर कल्पेश मराठे याने जोरात आवाज देऊन गाडी थांबवून तुम्हाला कसला माज आलाय तुम्ही भेगडे आहात तुमचा मज उतरवतो असे बोलून शिवीगाळ केली. आणि मंडपाचा बांबू घेऊन मराठे याने प्रतीक भेगडे व अनिकेत भेगडे यांच्या पोटावर, पाठीवर व पायावर मारून जखमी केले. प्रतीक भेगडे याच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेतली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील तपास करीत आहेत.
पोलीस निरीक्षकावर कारवाईचे अप्पर आयुक्तांचे आश्वासन
माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांचे कार्यकर्ते कल्पेश मराठे यांच्यावर 10 ते 11 जणांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. कल्पेश मराठे यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केल्याच्या विरोधात माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 6) सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयासमोर आंदोलन केले. या वेळी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी गुन्ह्यातील आरोपींना अटक करून कल्पेश मराठे यांच्यावरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊ. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मावळची जनता दादागिरी, दडपशाही सहन करणार नाही. पोलीस खात्याला देखील विनंती आहे, सत्तेच्या बळावर दडपण टाकण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आतापर्यंत संयम पाळला आहे, उद्याही संयमाने राहणार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. कोणी दडपशाही, दादागिरी करीत असेल, तर मावळची जनता सहन करणार नाही. आमचे क्षेत्र मारामारीचे नाही. आम्ही प्रेमाने माणसं जिंकणारे आहोत. प्रेमाने निवडणुका लढवा, कोणाला मारहाण करून कोणाचा जीव घेऊन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करू नका.
– सुनील शेळके, माजी उपनगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे.वराळे येथे घडलेली घटना ही निंदनिय आहे. कल्पेश मराठे हा आपलाही नातेवाईक आहे. रस्त्यावर साठलेले पावसाचे पाणी अंगावर उडाल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाला कोणीही राजकीय रंग देऊ नये. किरकोळ कारणावरून वाद झाले, शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्यातून हाणामारी झाली. त्यामागे कोणतेही राजकीय कारण नाही. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलीस तपास करून योग्य ती कारवाई करतील.
– संजय उर्फ बाळा भेगडे, राज्यमंत्री.