प्लॅस्टिकपासून घरनिर्मिती

सध्या प्लॅस्टिकच्या प्रदूषणाबाबत गंभीर चिंता व्यक्‍त केली जात आहे. म्हणून देशात बहुतांश राज्यात प्लॅस्टिकवर बंदी लागू केली आहे. प्लॅस्टिकचा अतिवापर हा पर्यावरणाला हानीकारक ठरत असून त्यापासून अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. प्लॅस्टिक वापर कमी होत असल्याने त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. मात्र हैदराबादच्या एका जोडप्याने प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामाचा व्हीडिओ पाहिला आणि त्यांनी प्लॅस्टिकवर पुनर्वापर करुन त्याचे प्रमाण कमी करता येईल का, याचा विचार केला. त्यानुसार प्लॅस्टिकवर प्रक्रिया करुन घर उभारले, स्कूल बेंच, बसस्टॉपची निर्मिती केली. या उपक्रमाचे कौतुक होत असून तेलंगण सरकारनेही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

हैदराबाद येथील उप्पल भागात राहणारे जोडपे प्रशांत लिंगम आणि त्यांची पत्नी अरुणा हे फर्निचर डिझायनर म्हणून ओळखले जातात. बाबूंपासून तयार होणाऱ्या फर्निचरवर डिझायन करण्याचा त्यांचा दहा वर्षांपासूनचा अनुभव आहे. 2017 मध्ये त्यांनी फर्निचरच्या आणि इंटरेयिरच्या कामात रिसायकल्ड प्लॅस्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक व्हीडिओ पाहिला होता. तो व्हीडिओ एका म्हशीवरील शस्त्रक्रियेचा होता. तिच्या पोटातून प्लॅस्टिकचा कचरा काढला होता. हा व्हीडिओ पाहून लिंगम जोडपे हादरले. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात संशोधन करण्यास सुरवात केली. त्यांनी केवळ प्लॅस्टिकपासूनच घर तयार करण्याचा विचार केला आणि त्यानुसार प्रयत्न सुरू केले. त्यांनी प्लायवूडचा पर्याय म्हणून प्लॅस्टिकपासून विविध वस्तू तयार केल्या. या वस्तूंसाठी दूध पिशव्यांचा वापर केला. त्याचा वापर फर्निचरसाठी, शौचालय, बेंच तसेच बस शेल्टरसाठी करता येऊ शकतो. उप्पल येथे लिंगम यांनी तयार केलेले घर सुमारे 800 चौरस
फुटाचे होते. त्यात 7 टन प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला.

लिंगम म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात वाया जाणाऱ्या प्लॅस्टिकपासून घर तयार केले. प्लॅस्टिकच्या घरात राहताना काही मंडळी घाबरतात, मात्र त्यांनी चिंता करायची गरज नाही. हे घर सिमेंट,वाळू-विटापासून तयार केलेल्या घराप्रमाणेच आहे. साधारणपणे सिमेंट-वाळूपासून घर बांधण्यासाठी किमान 40 लाख रुपये लागतात. मात्र त्याचवेळी प्लॉस्टिकच्या घराचे बांधकाम करताना केवळ 700 रुपये प्रति चौरस फूट खर्च येतो. हे घर आग, पाणी, उष्ण विरोधी आहे. या घराला 30 ते 40 वर्षे काहीही होत नसल्याचा दावा या जोडप्यांनी केला आहे. या कामासाठी प्रशांत लिंगम यांना तेलंगणा सरकार आणि ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेकडून मदत मिळत आहे. लिंगम म्हणाले की, काही शाळांनी या साहित्यापासून बेंच तयार करण्याची मागणी केली आहे. भारतातील 11 राज्यात प्लॅस्टिकवर बंदी आहे. अर्थात आपल्याकडे कायद्याची अंमलबजावणी करणे तितकेचे सोपे नाही. तेलंगण आणि अन्य राज्यातही प्लॅस्टिकवर बंदी आणली जाणार आहे. एकदा वापरलेल्या प्लॅस्टिवर 2020 किंवा 2021 पर्यंत बंदी आणली जाणार असल्याचे ते म्हणाले.

– स्वाती देसाई

Leave A Reply

Your email address will not be published.