पिंपरी – महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यपद्धतीवर सत्ताधारी भाजपातील नेते नाराज झाले असून त्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्याची बाब आज समोर आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या “तालावर’ कारभार करणाऱ्या हर्डीकरांना हटवून नवीन आयुक्तांची नियुक्त करण्याची मागणी भाजपाच्या एका नेत्याने केल्यामुळे महापालिकेत “हर्डीकर हटाओ’ मोहिमेची चर्चा रंगली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार श्रावण हर्डीकर यांनी अडीच वर्षापूर्वी घेतला होता. महापालिकेतील सत्तापरिवर्तनानंतर हर्डीकर हे सत्ताधाऱ्यांना अपेक्षित असलेले निर्णयच आजपर्यंत घेत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे आयुक्तअनेकवेळा टीकेचे धनीही झाले होते. याशिवाय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या पार्टी कार्यालयात घेतलेली भेट तसेच चंद्रकांत पाटील यांच्यासाठी महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरील आयुक्तांच्या कार्यालयात उठविण्यात आलेल्या “भोजनावळी’ यामुळे आयुक्त अडचणीत आले होते. विरोधकांची कामे अडविण्यापासून सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला साथ देणारे हर्डीकर हे आता सत्ताधाऱ्यांनाही नकोशे झाले आहेत.
मार्च 2020 पर्यंत आयुक्तांचा कालावधी आहे. मात्र कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच आयुक्तांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी छुपी मोहीम उघडल्याची बाब समोर आली आहे. शहरातील अनियोजित पाणीपुरवठा, खड्डे आणि कचरा समस्याची कारणे दिली जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आयुक्तही गेल्या वर्षभरात अयशस्वी ठरले आहेत.
सर्वसामान्यांच्या समस्यांमुळे की भाजपा अंतर्गत वर्चस्वच्या छुप्या लढाईतून आयुक्तांना हटविण्याची मोहीम सुरू झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सर्वसामान्यांपेक्षा भाजपातील अंतर्गत स्पर्धाच आयुक्तांच्या विरोधात कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.