ठेकेदारांची बिले अडवल्याने रस्ते दुरूस्तीची अडचण
सातारा – खराब रस्ते आणि धुळीने त्रस्त झालेल्या सदर बझारमधील नागरिकांची अजूनही खड्डेमय रस्त्यातून सुटका झाली नाही. पारंगे चौक ते भुरके कॉलनी या मुख्य मार्गाची अवस्था तर निम्म्या रस्त्यात डांबरीकरण आणि निम्मा खड्ड्यांचा रस्ता अशी झाली आहे. अपुऱ्या कामामुळे या भागातील नागरिकांना धुळीने त्रस्त केले आहे.
सदर बझारच्या शासकीय वसाहतीची तिसरी गल्ली ते कनिष्क मंगल कार्यालय मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे. रस्त्याच्या मुद्यावरून या भागातील राजकारण चांगलेच तापले. गेल्या काही वर्षात सदर बझारमध्ये रस्ते दुरुस्तीच्या निधीचा अनुशेष वाढल्याने व रस्ते कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. परिणामी रस्त्याचे काम रखडत गेले.
खराब रस्त्याने नागरिकांच्या आरोग्य विषयक तक्रारी वाढल्या. सात ते आठ महिन्यांपासून या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. डांबरीकरणाचा अभाव आणि खडी उखडल्याने या मार्गावर खड्डे पडले. खड्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना डर्ट ट्रॅकचा अनुभव घ्यावा लागत आहे. पारंगे चौक, एसपी बंगला, भुर्के कॉलनी, रिमांड होम, देशमुख कॉलनी, मुथा चौक या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पालिकेकडे गणतीच नाही.
खराब रस्त्यातून वाहने चालवल्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. धुळीचा फटका वाहन – धारकासोबतच दुकानदारांनाही बसला. धुळीमुळे दुकानातील वस्तू खराब होऊ लागल्या आहेत. त्याचा परिणाम विक्रीवर होऊ लागल्याचे दुकानदार आबदर मोमीन व संजय जंगताप यांनी सांगितले. गेल्या महिन्यात सदर बझारमधील रस्त्यांचे सात वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर निधीचा अनुशेष वाढत गेल्याने रस्त्यांचे खड्डे आणि वाहनांचे अपघात वाढले. सदर बझार पोलीस चौकीच्या आठव्या गल्लीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात आला.
आठवी ते सातवी गल्लीतील रस्त्याच्या डाव्या बाजूचे डांबरीकरणच करण्यात आले नाही, कारण येथे अतिक्रमणांचा असलेला घोळ शहर विकास विभागाने निस्तरलेला नाही. गेल्या पाच वर्षात प्रभाग क्रमांक दोन तीन व चार या तीन प्रभागात मंजूर तीन कोटी रूपयांपैकी केवळ 63 लाख रुपये रस्ते दुरुस्ती वर सदर बझारमध्ये खर्च झाले. भारतमाता चौक ते समाजकल्याण कार्यालय या दरम्यान डांबरीकरणाचा पत्ता नाही, कुठे पॅचवर्क करण्यात आले नाही. यामुळे खड्ड्यातून वाट काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत
आहे.