नगर – नगरमधील आयुर्वेद तज्ञांकडून बूथ हॉस्पिटल येथे करोना पॉझिटिव्ह रुग्णांची तीन दिवसांपासून तपासणी व त्यांच्यावर आयुर्वेद उपचार केले जात आहेत. रुग्णांना आयुर्वेद औषधेही मोफत दिली जात आहेत. या औषधांचा रुग्णांवर सकारात्मक परिणाम पहायला मिळत आहेत. त्याचबरोबर रुग्णांना प्रतिकारशक्ती उत्तम राहावी मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहावे, यासाठी आहार-विहार व व व्यायाम कशा प्रकारचा असावा यासाठी तज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जात आहे.
राज्य सरकारने करोना पॉझिटिव्ह रुग्णांना आयुर्वेद उपचार देण्यासाठी नुकतीच मान्यता दिली. त्यानुसार ही वैद्यकीय सेवा सुरु करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील आयुर्वेद तज्ञांचा समावेश असलेली आयुर्वेद व्यासपीठ , महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन व प्रभा आयुर्वेद यांनी एकत्र येऊन करोना प्रतिबंध व उपचारासाठी स्वेच्छेने उपक्रमास सुरुवात केली आहे.
आयुष मंत्रालयाने कोविड-19 संसर्ग टाळण्यासाठी व उपचारासाठी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे, जिल्हा आयुष अधिकारी व जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करोना पॉझिटिव्ह रुग्णांना आयुर्वेद उपचार व प्रतिबंधात्मक उपायांचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याशिवाय विलगीकरण केलेल्या हाय रिस्क, लो रिस्क गटातील व्यक्तींना प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रतिबंधात्मक आयुर्वेद उपचार आजपासून सुरु करण्यात आले. आयुर्वेद तज्ञांनी यावेळी प्रतिबंधात्मक आयुर्वेद औषधींचे मोफत वाटप केले. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आयुष मंत्रालयाने निर्देशित उपायांविषयी मार्गदर्शन केले .नागरिकांच्या मनातील भीती घालवून त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल याचे मार्गदर्शन केले गेले. प्रतिकारशक्तीवर्धक आहार, विहार व व्यायामाचे मार्गदर्शन करणारी माहितीपत्रके यावेळी वितरित करण्यात आली.
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे , तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योती मांडगे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, नवनागापूर येथील ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब सप्रे आदी यावेळी उपस्थित होते. आयुर्वेद तज्ञ डॉ. महेश मुळे, डॉ..अंशू मुळे, डॉ. महेंद्र शिंदे ,डॉ. मंदार भणगे, जिल्हा रुग्णालयाचे आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी डॉ. शौनक मिरीकर, डॉ. लक्ष्मीकांत कोर्टीकर, डॉ.वर्षा कोर्टीकर, डॉ. विक्रम म्हसे, डॉ. विलास जाधव, डॉ. मंगेश काळे, डॉ. रवींद्र नरवडे, डॉ. मानसी कांबळे, डॉ. मैत्रेयी लिमये, डॉ. अविनाश जाधव या उपचारपद्तीत सहभागी झाले होते.