पुणे – करोना महामरीने सगळीकडे थैमान घातले आहे. सगळ्यांची घडी विस्कटून टाकली आहे. लहान मोठे उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार इतकेच नव्हे तर सरकारचेही हात यात पोळले आहेत. या सगळ्या बातम्या आपण रोज वर्तमानपत्रांतून वाचतो. वर्तमानपत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल कोणालाही शंका नसते. कारण वर्तमानपत्रांत गाळणी करून आणि प्रत्येक तथ्य तपासूनच बातम्या दिल्या जातात.
असंख्य हात आणि डोकी त्यासाठी राबतात. आमच्या आणि वाचकांच्या या संवादातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे आमचे विक्रेते बांधव असतात. त्यांना आपण “पेपरवाले काका’ही म्हणतो. हा घटक अथवा ही साखळी करोनामुळे पूर्णत: विस्कळीत झाली असून त्यांना आता गरज आहे, आपल्या मदतीची, पुन्हा उभे राहण्यासाठी हात आणि धीर देण्याची.
करोनाच्या सुरुवातीला ऐकीव माहिती आणि काही बेजबाबदार माध्यमांच्या चुकीच्या वार्तांकनामुळे पेपरला हात लावण्यासही वाचक धजावत नव्हते. अर्थात वर्तमान पत्रांनी वाचकांशी असलेला संपर्क जपला. मात्र, यातील आमचे वृत्तपत्र विक्रेते बांधव अजूनही अडचणीतच चाचपडत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचा व्यवसाय ठप्प आहे. कुठे थोड्याफार प्रमाणात सुरुवात झाली असली तरी अजूनही ते धावू शकत नाहीत. त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी पाठबळ हवे आहे.
आपण काय करायचे?
अडचणीत सापडलेल्या विक्रेते बांधवांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी, संस्थांनी, सामाजिक मंडळांनी, व्यक्तींनी पुढे यावे आणि आर्थिक स्वरूपात मदत करत गरीब वृत्तपत्र विक्रेत्यांना आधार द्यावा.
येथे करू शकता मदत…
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ ही नोंदणीकृत संस्था आहे. या संस्थेच्या बॅंक ऑफ महाराष्ट्र, (बाजीराव रोड शाखा) खाते क्र. 60131088730 या खात्यावर आपली रक्कम जमा करू शकता.