-माधव विद्वांस
विनोदी अभिनेत्री म्हणून रूपेरी पडद्यावर आणि रंगमंचावर भूमिका साकारणाऱ्या मनोरमा वागळे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म मुंबई येथे वर्ष 1928 मध्ये कोकणी भाषिक कुटुंबात झाला. पूर्वाश्रमीच्या सुमती तेलंग विवाहानंतर मनोरमा वागळे झाल्या. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यातील अभिनयाची आवड पाहून त्यांना प्रोत्साहन दिले.लहानपणापासून सदैव आनंदी असे व्यक्तिमत्त्व त्यांना लाभले होते. त्याच्या जोडीला मिश्कील स्वभावाची जोड यामुळे अभिनयामध्येही त्याचा उपयोग झाला.
शालेय व महाविद्यालयीन संमेलनातून अनेक नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला. “दि गोवा हिंदू असोसिएशन’चे मा. दत्ताराम यांच्याकडून त्यांनी याबाबतीत मार्गदर्शन घेतले. तसेच गोविंदराव अग्नी, बी. आर. देवधर, पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडून त्या गायन शिकल्या. प्रसिद्ध गायक आर. एन. पराडकर यांच्याकडे त्यांनी सुगम संगीत व नाट्यसंगीताचे धडे घेतले. गोविंदराव वेर्लेकर यांच्याकडून गंधर्व कंपनीची नाट्यगीते शिकली.
मनोरमा यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून रंगभूमीवर प्रथम पाऊल ठेवले.”खडाष्टक’ या नाटकातील तडाखेबाज रागिणीच्या भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही मिळाला. अनेक नाटकांत त्यांनी अभिनय केला. “दिनूच्या सासूबाई’ या बबन प्रभूंचे फार्सिकल नाटकामधील राधाबाई ही त्यांची सासूबाईची भूमिका अविस्मरणीय ठरली. 1985 ते 1995 या दहा वर्षांच्या कालावधीत या नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर होत राहिले. यावेळी अनेक कलाकार बदलले, पण सासूबाई मात्र कायम राहिल्या.
या काळात त्या मनोहर वागळे यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. विवाहानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यांनी त्यांच्या भूमिका सहजतेने रंगवल्या. त्यामुळेच त्या नावारूपास येऊ लागल्या. अनेक चित्रपटांतून खाष्ट, भांडकुदळ, कजाग, खलनायिका तसेच विनोदी भूमिका साकारल्या.त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावामुळे विनोद निर्मिती होत असे. मनोरमा वागळे यांचे व्यक्तिमत्त्व कडक स्वभावाचे दिसत होते, तरी त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. अभिनयात खाष्टसासू, भांडकुदळ शेजारीण, कारस्थानी/कपटी, विनोदी असणाऱ्या मनोरमाबाई गृहदक्ष गृहिणी होत्या.
वर्ष 1976 मध्ये “सिकंदर’ या चित्रपटात त्यांनी अभिनय केला. वर्ष 1981 मध्ये “घरजावई’, वर्ष 1982 मध्ये “उंबरठा’ या चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. “गडबड घोटाळा’, “प्रेमासाठी वाट्टेल ते’, “गंमत जंमत’, “माहेरची माणसं’ या चित्रपटांत त्यांनी काम केले. मनोरमा यांनी “राजाने वाजविला बाजा’मध्ये कडक सासूची, “आत्मविश्वास’मध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, तर “आम्ही दोघे राजाराणी’ या चित्रपटामध्ये जमीनदार महिलेची भूमिका केली.
“हसण्यासाठी जन्म आपुला’, “लाइफलाइन’, “हम पाच’ या त्यांच्या टीव्ही मालिकाही गाजल्या. वर्ष 1992 मध्ये प्रकाश मेहरा निर्मित “सगळे सारखेच’ या चित्रपटामध्ये सदाशिव अमरापूरकर, लक्ष्मीकांत बेर्डे, मास्टर भगवान, सुहास भालेकर, अश्विनी भावे, प्रशांत दामले, शफी इनामदार, सुधीर जोशी, शुभ खोटे, अर्चना पाटकर अशा दिग्गज कलाकारांसमवेत मनोरमा वागळे यांनीही भूमिका वठविली होती.
त्यांनी काही जाहिरातींमधूनही काम केले. लक्ष्मण बेर्डे त्यांना पॅनोरमा म्हणायचे. 27 ऑगस्ट 2007 रोजी त्यांचे माहिम येथे हृदयविकाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात मनोहर वागळे व तीन मुली असा परिवार आहे. अभिनेत्री मेधा जांबोटकर या त्यांच्या कन्या आहेत.