सार्वमत होवो न होवो, लडाख भारतांतच राहणार!
हिंदुस्थान ही लडाखची हृदयस्थ देवता
भारतात राहणे किंवा मरणे हाच एक मार्ग!
श्रीनगर, ता. 26 : “”सार्वमत घेण्यात येवो अथवा न येवो, लडाखनें हिंदुस्थानात सामील होण्याचा घेतलेला जनतेचा निर्णय मुळीच बदलता येणार नाहीं. आम्ही आमचा मार्ग चोखळला आहे. आमचें भलेबुरें काय वाटेल ते होवों, पण आम्ही हिन्दी संघराज्यांतून मुळीच बाहेर पडणार नाहीं. आमचे तिबेटबरोबर धार्मिक संबंध जडलेले असले तरी हा निर्णय आम्ही फिरवणार नाहीं,” असे उद्गार लडाखचे लामा कौशिक बकुला यांनी वृत्तपत्र प्रतिनिधींपुढे बोलताना काढलें.
ते पुढे म्हणाले, “”लडाखमध्ये सार्वमत घेतल्यानंतर लडाखनें भारतांत सामील व्हावें की, पाकिस्तानांत जावें, याचा निर्णय लागेल, असें मी म्हणाल्याचें काहीं पत्रांनीं प्रसिद्ध केले आहें; मी असे कधीही बोललो नव्हतों.” हे उद्गार काढतांना त्यांच्या विशाल भालप्रदेशावर शीघ्रकोपाच्या आठ्या पडल्या होत्या.
कोरियन परिषदेच्या ठरावावर मतदान न करण्याचा हिंदचा निर्णय
न्यूयॉर्क, ता. 26 : “”कोरियन राजकीय परिषदेत हिंदुस्थानला भाग घेऊ द्यावा किंवा नाहीं, या ठरावावर हिंदुस्थानच्या वतीने मतदान केले जाणार नाहीं. पण हिंदुस्थानला राजकीय परिषदेचें निमंत्रण द्यावें, असें राष्ट्रसंघानें ठरविले तर त्या परिषदेंत हिंदुस्थान भाग घेईल,” असें उद्गार राष्ट्रसंघातील हिंदी प्रतिनिधी श्री. कृष्ण मेनन यांनी राष्ट्रसंघाच्या चालू खास अधिवेशनांत काढलें.
रशियाचा पाठिंबा…
रशियाचें प्रतिनिधी आंद्रे व्हिशिन्स्की या विषयांवर बोलतांना म्हणाले, “”कोरियांत शांतता स्थापित व्हावी म्हणून हिंदुस्थानने कळकळीनें प्रयत्न केलें, हिंदुस्थानला राजकीय परिषदेचें निमंत्रण न देणें म्हणजे हिंदुस्थानवर अन्याय होईल.”
अमेरिकेचा विरोध…..
अमेरिकन प्रतिनिधी हेन्री कॅबॉट लॉज म्हणाले, “”हिंदुस्थाननें राजकीय परिषदेत भाग घेण्यास दक्षिण कोरियाचा विरोध असतांना हिंदुस्थानला राजकीय परिषदेत भाग घेऊ दिला, तर राजकीय परिषद यशस्वी होणार नाही. म्हणून अमेरिकेचा हिंदुस्थानने राजकीय परिषदेत येण्यास विरोध आहे.”