चंदीगड – पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मोठी मुसंडी मारली असून राज्यात पक्षाला एकूण ११७ जगणापैकी ९२ जागांवर आघाडी मिळाली आहे. सत्तास्थापनासाठी ५९ जागांचे संख्याबळ आवश्यक असलेल्या पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सहज सत्ता स्थापन करेल असं चित्र दिसत आहे. ‘आप’ने निवडणुकांपूर्वीच भगवंत सिंग मान यांना पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केलं होत. ४८ वर्षीय मान एक विनोदी कलाकार म्हणून काम करत असताना पंजाबच्या घराघरात पोहचले होते, ते आता पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रं लवकरच हाती घेतील.
आम आदमी पक्षाने घेतलेल्या एका टेलिफोनिक सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री म्हणून मान यांच्या नावाला २१ लाख पंजाबी नागरिकांनी पसंती दर्शवली होती. यानंतर निवडणुकीच्या अगदी महिनाभर आधी मान हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील अशी घोषणा करण्यात आली होती. याच भगवंत सिंग मान यांचा कॉमिडी ते राजकारण असा प्रवास कसा होता हे आपण जाणून घेणार आहोत.
१८ व्या वर्षी ठरले प्रसिद्ध कॉमेडियन
भगवंत सिंग मान यांचा जन्म एका शिक्षक कुटुंबात झाला. मान यांनी १८ वर्षांचे असताना समाज व राजकारणावर टीकात्मक मात्र विनोदी रंग असलेलं एक ऑडिओ कॅसेट प्रसिद्ध केलं. ते त्यावेळी उध्धम सिंग कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी होते. काही कालावधीतच ते संपूर्ण पंजाबमध्ये प्रसिद्ध झाले. त्यांचा जुगनू मस्त मस्त हा टीव्ही शो विशेष गाजला.
राजकारणात प्रवेश
भगवंत सिंग मान हे विनोदी कलाकार म्हणून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतानाच त्यांनी कॉमेडी सोडून राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. २०११ मध्ये मान पीपल्स पार्टी ऑफ पंजाबमध्ये सामील झाले. पंजाबचे ५ वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश बादल यांचा पुतण्या मनप्रीत सिंग बादल यांचा हा पक्ष होता. राजकारण भ्रष्ट्राचारमुक्त असावे अशी या पक्षाची विचारसरणी असल्याने मान यांनी पीपल्स पार्टी ऑफ पंजाबमध्ये प्रवेश केला होता.
पहिल्या निवडणुकीत पराभव
पीपल्स पार्टी ऑफ पंजाबकडून लढताना २०१२ मध्ये भगवंत सिंग मान यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांनी लेहरागाग विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.
२०१४ मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश
२०१४ मध्ये मनप्रीत सिंग बादल यांनी पीपल्स पार्टी ऑफ पंजाब काँग्रेस पक्षामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला. भगवंत सिंग मान यांचा या निर्णयास विरोध होता. त्याचवेळी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी मान यांना पक्षात येण्यासाठी गळ घातली व पक्षाच्या तिकिटावर संगरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितले. इथे मान यांनी करिश्मा दाखवत तब्बल २ लाख मतांनी अकाली दलाचे नेते धिंडसा यांचा पराभव केला. येथून मान यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मागे वळून पहिलेच नाही.
२०१७ मध्ये सांभाळली प्रचाराची धुरा
भगवंत सिंग मान यांनी २०१७ पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचाराची धुरा सांभाळी होती. आम आदमी पक्षाच्या ३००हून अधिक प्रचारसभांमध्ये संबोधन केलं होत. त्यावेळी त्यांनी सत्तेत असलेल्या अकाली दलाविरोधात पंजाबी भाषेत दिलेली घोषणा ‘किकली-कलीर’ विशेष गाजली. मात्र नंतर यावरून केजरीवाल यांना बादल कुटुंबीयांनी ठोकलेल्या मानहानीच्या दाव्यावरून माफी मागवी लागली होती.
व्यसनाधीनतेचे आरोप
भगवंत सिंग मान यांच्यावर त्यांच्या संसदेतील सहकाऱ्यांनी ते सभागृहात दारू पिऊन येतात अशी तक्रार केली होती. २०१७ मध्ये मान एका प्रचार सभेमध्ये सामील झाले होते. त्यावेळी ते जनतेकडे पाहून फ्लाईंग कीसेस देत असताना कोसळले होते. तेव्हा देखील मान यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत प्रचार करत असल्याचा आरोप झाला होता. मात्र २०१९ मध्ये पक्षाने मान यांनी स्वतःमध्ये बदल केला असल्याचं सांगण्यात आलं. केजरीवाल यांनी स्वतः मान यांनी मद्यप्राशन सोडून दिलं असल्याचं सांगितलं होत.