चंदीगड – चित्रपट अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद पंजाब विधानसभा निवडणुकीत मोगा मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत. आम आदमी पार्टीच्या उमेदवार डॉ. अमनदीप कौर यांनी मालविका यांचा 20915 मतांनी पराभव केला.
अकाली दलाचे बरजिंदरसिंग ब्रार तिसऱ्या स्थानावर आहेत. मोगा ही पंजाबमधील हायप्रोफाईल जागांपैकी एक आहे आणि येथे चित्रपट अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद निवडणूक रिंगणात होत्या. पण त्यांना विजय मिळवता आला नाही.
मोगा विधानसभेची जागा सुरुवातीपासूनच पंजाबची महत्त्वाची जागा मानली जाते. 5 वर्षांपूर्वी 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली होती. काँग्रेसच्या हरजोत कमल सिंग यांनी चुरशीच्या लढतीत आम आदमी पार्टीच्या रमेश ग्रोवर यांचा १७६४ मतांनी पराभव केला होता.
1957 पासून मोगा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली जात आहे. आतापर्यंत झालेल्या 15 विधानसभा निवडणुकांपैकी काँग्रेस पक्षाने 10 वेळा विजय मिळवला आहे. डॉ हरजोत कमल यांच्या आधी जोगिंदर पाल जैन यांनी सलग तीन वेळा मोगा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ते 2007 आणि 2012 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते, नंतर ते शिरोमणी अकाली दलात सामील झाले होते. यामुळे 2013 मध्ये पोटनिवडणूक झाली, ज्यामध्ये जोगिंदर पाल पुन्हा विजयी झाले.