आ. पाटील यांच्या प्रचाराचा पाल येथे शुभारंभ

उंब्रज – खंडोबा-म्हाळसा आणि बानाईचा आशीर्वाद घेऊन आमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी जमलेल्या या अथांग जनसमुदायाकडे बघितले की ऑल इज वेल वाटत असल्याची भावनिक साद सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.

पाल ता. कराड येथे खंडोबा-म्हाळसा देवाचे दर्शन घेऊन लोकसभा, विधानसभा उमेदवार निवडणूक प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सम्राट मौलाजी गुरुजी अध्यक्षस्थानी होते. आ. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, मुक्‍तिदल संघटनेचे अध्यक्ष भारत पाटणकर, देवराज पाटील, पार्थ पोळके, राजेंद्र शेळके यांची उपस्थिती होती.

श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले, मी खेड्यातील आहे. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने हातात घेतलेले काम मला तडीस न्यायचे आहे, त्यासाठी तुमची साथ हवी आहे. आमच्या विजयाची मिरवणूक नक्कीच निघणार असून सिमोल्लंघन दिवशी आयोजित या सभेत आपले अनमोल मत आमच्या पारड्यात टाकण्याचा निश्‍चय तुम्हीही करा, अशी भावनिक साद त्यांनी घातली.

आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, मी माझ्या राजकीय कारकिर्दीत राजकारण कमी तर समाजकारण जास्त केले आहे. विरोधक नुसत्या वल्गना करत आहेत. आज या प्रचार शुभारंभाला व्यासपीठा समोर बसायला जाग कमी पडली ही कामाची पोचपावतीच आहे. यावेळी मानसिंगराव जगदाळे, हेमंतराव जाधव, अजित आप्पा चिखलीकर, दत्तात्रय विर्दुके, लालासाहेब पवार, राजू शेळके, चंद्रकांत जाधव, ऍड. संभाजी मोहिते, संगिता साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.