पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला संवाद 

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्यांकडून घेतला चहाचा पाहुणचार

कराड  – मंगळवार, दि. 8 रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अगदी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या कराडकर नागरिकांच्या भेटीला माजी मुुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आल्यामुळे सवर्चजण अचंबित झाले.

सकाळी सात वाजता आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रीतिसंगम बागेत मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला. त्यांच्याशी अनेकविध विषयांवर चर्चा केली. हे करत असताना नागरिकांनी आ. चव्हाण यांना चहाचा पाहुणचारही दिला. त्यांनी अगदी हातगाड्यावर उभे राहून चहा-नाश्‍ता घेत नागरिकांशी संवाद साधला.

आ. चव्हाण यांनी मंगळवारची सकाळ कराडकरांच्या आठवणीत राहील अशी गाजवली. सुरुवातीस आ. चव्हाण तेथे आल्यानंतर त्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण समाधी स्थळावर दर्शन घेतले. त्यानंतर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या व हास्य क्‍लबच्या लोकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्याच्यावर कोणत्या उपाययोचना करता येतील याविषयी चर्चा करण्यात आली.

अचानक पृथ्वीराजबाबा तेथे आल्यामुळे सुरुवातीला मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना आश्‍चर्य वाटले. पण त्यानंतर ते सर्वांशी संवाद साधत आहेत हे बघितल्यावर हळूहळू कराडमधील नागरिक त्यांच्याशी स्वतःहून येऊन भेटू लागले. अनेकांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे कराडचा झालेला कायापालट याचा भरभरून कौतुक केले.

सर्वांशी आ. चव्हाण संवाद साधत होते त्याचवेळी काही नागरिकांना आ. चव्हाण यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. यामध्ये जेष्ठ नागरिक, तरुण, महिला आदींचा समावेश होता.

यावेळी नागरिकांनी आ. चव्हाण यांनी कराड व मतदारसंघात केलेल्या विकासकामांना उजाळा दिला. एकजण वयोवृद्ध म्हणाले, बाबा तुम्ही प्रीतिसंगम बागेच्या विकासासाठी निधी दिल्यामुळे अतिशय सुंदर परिसर बनला आहे. त्यामुळे आम्हाला उत्तम आरोग्य कमविण्यासाठी याचा फायदा झाला आहे. असेच उपक्रम राबवावेत अशीही विनंती त्यांनी केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.