सातारा – सातारा-जावळी मतदारसंघाचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी (दि. 30) रात्री जनसैलाब उसळला. सातारा आणि जावळी तालुक्यांसह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील जनतेने आ. शिवेंद्रसिंहराजेंवर शुभेच्छांचा वर्षाव केला. राज्यातील नेतेमंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि सदिच्छा कायम पाठीशी राहू द्या. केव्हाही हाक द्या, तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजेंनी जनतेला दिला.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 30) सकाळपासून कार्यक्रमांची रेलचेल होती. सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत राजवाडा येथील गांधी मैदानावर महारुद्र पंचायतन महायज्ञ उत्साहात झाला. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या विशेष प्रयत्नातून झालेल्या कास पठार व बामणोलीकडे जाणाऱ्या सुसज्ज रस्त्यावर स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले कमानीचे उद्घाटन दुपारी 4.30 वाजता यवतेश्वर येथे उत्साहात झाले. त्यानंतर सायंकाळी पोवई नाका येथे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महाभिषेक आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
मंगळवार पेठेतील आनंदाश्रम, सोमवार पेठेतील लक्ष्मीबाई पाटील वसतिगृह, सदरबझारमधील रिमांड होम, कोडोलीतील आशा भवन, खावलीतील मातोश्री वृद्धाश्रम, वळसे, ता. सातारा येथील एहसास गतिमंद शाळा, साताऱ्यातील जरंडेश्वर नाक्यावरील भिक्षेकरी गृह, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय (रुग्ण व नातेवाईक), आर्यांग्ल रुग्णालय (रुग्ण), धनिणीची बाग येथील शाहू बोर्डिंग, मदरसा कब्रस्तान आणि मोळाचा ओढा येथील मदरसा या ठिकाणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यातर्फे मिष्टान्न भोजन वाटप करण्यात करण्यात आले.
त्यानंतर सायंकाळी कोटेश्वर मैदानासमोरील कला व वाणिज्य कॉलेजच्या मैदानावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जनतेच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्या आधी पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. सायंकाळी 6 पासूनच मैदानावर हळूहळू गर्दी जमायला सुरुवात झाली. काही वेळाने आ. शिवेंद्रसिंहराजे कार्यक्रमस्थळी दाखल झाले आणि फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कार्यक्रमस्थळी भव्य मंचावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जनतेच्या शुभेच्छा स्वीकारण्यास सुरुवात केली. सातारा शहर आणि उपनगरातील नागरिकांचे जथ्थे कार्यक्रमस्थळी दाखल होऊ लागले. दोन्ही तालुक्यांमधील कार्यकर्ते आणि शिवेंद्रसिंहराजेप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजेंचा जयजयकार करत कार्यकर्ते आणि नागरिक त्यांना शुभेच्छा देत होते. रात्री आठच्या सुमारास मैदान खचाखच भरले. माताभगिनी, अबालवृद्धांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजेंसोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. आ. शिवेंद्रसिंहराजेंवर रात्री उशिरापर्यंत शुभेच्छांचा वर्षाव सुरुच होता. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यातील अनेक मंत्री व विविध पक्षाच्या नेत्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.