CM Siddaramaiah : कर्नाटकमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात सत्ता संघर्ष सुरु आहे. सध्या काँग्रेसचे सरकार राज्यात अस्तित्वात आले असले तरी पुन्हा एकदा कर्नाटकमधील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याचे स्वतः मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कर्नाटकात राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी याविषयी बोलताना, “हे खरं आहे की, भाजपाचे लोक आमचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यात त्यांना यश मिळणार नाही. भाजपाने याआधी आमचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात त्यांना यश मिळालं होतं. मात्र, त्यांना पुन्हा यश मिळणार नाही.” “हे तर स्पष्ट आहे की, भाजपा सत्तेसाठी काहीही करू शकते. मात्र, त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी आमचा एकही आमदार त्यांच्याबरोबर जाणार नाही,” असे म्हटले आहे.
दरम्यान, कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना घडताना पाहायला मिळत आहे. कारण आयुष्यभर निधर्मवादाची कास धरणारे माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दल पक्षात संतप्त प्रतिक्रिया उमटली.
तर कर्नाटक जनता दलाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री सी. एम. इब्राहिम यांनी बंडाचे निशाण फडकविले. पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य नसून, जनता दलाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखले जाईल, असे इब्राहिम यांनी जाहीर केले. त्यावर देवेगौडा यांनी त्यांचे एकेकाळचे निकटवर्तीय इब्राहिम यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली.