Gunratna Sadavart : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. मोठ्या संख्येने लोकांनी देखील त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र मराठा आरक्षणला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मराठा समाजातील बांधवांनी मोठं मोठ्या पदावर जावं पण मागासवर्गीय होण्याच्या भानगडीत पडू नये, असा सल्ला सदावर्ते यांनी दिली आहे.
काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते ?
“मराठा आरक्षणाचा वाद उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी उभा केला आहे. आमच्यात हा कुठलाही वाद नसून आरक्षणाचा हा राजकीय डाव होता, हे पुढील काळात मराठा बांधव समजून घेतली, आमच्यात कुठलाही वाद नाही. मराठा समाजातील बांधवांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारणी आपली पोळी भाजत असल्याचे येणाऱ्या काळात समजेल. मराठा समाज आरक्षणात बसत नाही. मराठा समाजातील बांधवांनी मोठं मोठ्या पदावर जावं पण मागासवर्गीय होण्याच्या भानगडीत पडू नये,” असा सल्ला गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
मुंबईत गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunaratna Sadavarte) गाडीची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. या विषयी बोलताना सदावर्ते म्हणाले, गाडी फोडली किंवा मला मारून टाकलं तर आरक्षण मिळेल का? तुम्हाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. तुम्ही आरक्षण मागा पण जोर जबरदस्तीने केलेल्या मागणीला भारताचे संविधान मान्यता देत नाही,” असेही सदावर्ते यांनी सांगितले. वसईत एका लग्नसमारंभात गेल्यानंतर पत्रकारांनी विचालेल्या प्रश्नांवर ते बोलत होते.
मनोज जरांगेंना अटक करण्याची सदावर्ते यांनी केली होती मागणी
मराठा आरक्षणाबाबत विरुद्ध भूमिका घेणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या काही व्यक्तींनी फोडल्या होत्या. याप्रकरणी सदावर्ते यांनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. इतकेच काय तर मनोज जरांगेंना अटक करण्याची मागणी देखील गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती.