मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. गत काही महिन्यांतील या दोन्ही नेत्यांची ही ६ वी भेट आहे. या भेटीचाही तपशील नेहमीप्रमाणे गुलदस्त्यात ठेवण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना मोठे उधाण आले आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, या भेटी दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकरही उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांत जवळपास अर्धा तास बंद दरवाज्याआड चर्चा झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी पाट्या व टोलनाक्यांवरील अवैध वसुलीचा मुद्दा उचलून धरला आहे. मराठी पाट्याविषयी व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावल्यामुळे मनसेने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात याव्यात, तसेच कोर्टाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचा पाठपुरावा या बैठकीत घेण्यात आल्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रणावरूनही मोठा वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. पण उद्धव ठाकरे यांना ते अद्याप मिळाले नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्याला अद्याप निमंत्रण मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे या प्रकरणीही उभयंतांत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.