इंदूर – मध्यप्रदेशातील ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी गुरूवारी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याने त्यांनी पक्षाचे पद सोडले.
विजयवर्गीय यांनी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा सादर केला. एक व्यक्ती, एक पद या पक्षाच्या धोरणाला अनुसरून ते पाऊल उचलल्याची माहिती स्वत: विजयवर्गीय यांनी सोशल मीडियावरून दिली.
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काळात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या नेत्यांमध्ये विजयवर्गीय यांचाही समावेश होता. मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, भाजपच्या घवघवीत यशानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर समाधान मानावे लागले.
विजयवर्गीय नऊ वर्षे पक्ष संघटनेत कार्यरत होते. त्यामुळे जवळपास दहा वर्षे ते निवडणूक रिंगणापासून दूर राहिले. मात्र, यावेळी त्यांना पक्षाने इंदूरमधून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली.
त्या अनपेक्षित उमेदवारीबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र, कॉंग्रेसकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता विचारात घेऊन भाजपने ज्येष्ठ नेत्यांनाही रिंगणात उतरवले. विजयवर्गीय हेही अपवाद ठरले नाहीत. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर भाजपने विजयवर्गीय यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिले.