वॉशिंग्टन – अमेरिकेने युक्रेनला २५० दशलक्ष डॉलर किंमतीची युद्ध सामुग्री आणि उपकरणे देण्याची घोषणा केली आहे. या वर्षात युक्रेनला दिली जाणारी अमेरिकेची ही अखेरची मदत असणार आहे.
ही मदत युक्रेनला दिली जाण्याबरोबर नवीन वर्षात आणखीन मदत मंजूर करण्यासाठी बायडेन प्रशासनाने अमेरिकेच्या संसदेवर दबाव निर्माण केला आहे.
युक्रेनला आपल्या देशाचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी मदत करण्याची आमची वचनब्दधता आम्ही जपली आहे, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे. भविष्यात युक्रेनला दिल्या जाणाऱ्या या मदतीच्या पॅकेजला संसदेने लवकरात लवकर मंजूरी देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
युक्रेनला दिल्या जाणाऱ्या या मदतीमध्ये युद्धसामुग्री, दारुगोळा आणि हवाईसंरक्षण यंत्रणेचा समावेश असणार आहे. याशिवाय लहान शस्त्रांसाठीच्या तब्बल १५ दशलक्ष काडतुसांचाही पुरवठा युक्रेनला केला जाणार आहे.
याशिवाय रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रेही युक्रेनला उपलब्ध करून दिली जाणार आहेत. रशिया आणि युक्रेनदरम्यानचे युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने युक्रेनला ४४.३ अब्ज डॉलर किंमतीची युद्धसामुग्री आणि उपकरणे दिली आहेत.