सर्वच रस्ते सभास्थळाकडे जाताना नागरिक घामाघूम

एक ते दीड किलोमीटर भर उन्हात करावी लागली पायपीट ः गर्दीने गजबजले

नगर  –
भाजप व शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सावेडी येथे जाहीर सभा झाली. यावेळी उपस्थितांच्या गर्दीने सभास्थळाकडे जाणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलले होते. मात्र वाहनतळ ते सभास्थळाचे अंतर सुमारे दीड ते दोन किलोमीटर असल्याने नागरिकांना भर उन्हात चालत सभास्थळी यावे लागले. त्यामुळे त्यांची चांगलीच घामाघूम झाली.

संत निरंकारी भवनामागील मैदानात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. सकाळपासूनच सभास्थळी नागरिक येणारस सुरुवात झाली होती. नगर-मनमाड रस्त्याने येणाऱ्या वाहनांची पार्किंगची सोय मिस्कीन मळा परिसरात करण्यात आली होती. तेथून गंगा उद्यानाच्या पाठीमागून पंकज कॉलनीमार्गे सावेडी टेलिफोन एक्‍सचेंज पर्यंत नागरिकांना पायी जावे लागले. भर उन्हात पायी चालून सभास्थळी जावे लागले. तसेच गुलमोहर रस्त्यावरून सभास्थळी जाणाऱ्यांसाठी कुष्ठधाम रस्त्यावर पार्किंगची सोय करण्यात आली होती. औरंगाबाद रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांसाठी एकवीरा चौकात पार्किंगची सोय करण्यात आली होती. त्यामुळे पार्किंगपासून सभास्थळी येणाऱ्या नागरिकांची चांगलीच दमछाक झाली. तसेच उन्हामुळे ते चांगलेच घामाघूमही झाले होते. अनेक जण रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या सावलीचा आसरा घेत होते.

सभास्थळी आल्यावरही सभामंडपाकडे जाताना पोलिसांकडून तपासणीच्यावेळी पाण्याच्या बाटल्या बाहेर ठेवण्यास सांगण्यात येत होते. त्यामुळे तपासणीच्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्यांचा खच पडला होता. सभास्थळी मंडप असल्याने नागरिकांची उन्हापासून काहीकाळ सुटका झाली. मात्र उन्हामुळे वाढलेल्या उष्म्यामुळे मंडपातील जनताही चांगलीच हैराण झाली होती. त्यामुळे अनेकांनी परिसरात असलेल्या झाडांच्या सावलीचा आसरा शोधला होता. अनेकांनी सभास्थळी लावण्यात आलेल्या टॅंकरच्या सावलीला बसकन मांडली होती. सभामंडपात येताना पाण्याच्या बाटल्या बाहेरच ठेवाव्या लागल्या होत्या. उन्हामुळे घसा कोरडा पडत असल्याने सभास्थळी ठेवण्यात आलेल्या जारचे पाणी पिण्यासाठी चांगलीच गर्दी होत होती. सभा संपल्यावरही पुन्हा उपस्थितांना भर उन्हात पायपीट करत वाहन तळाकडे जावे लागले. मात्र अशाही परिस्थितीत सभेला आलेल्यांच्या उत्साहात कुठलीही कमतरता जाणवली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.