वाकचौरेंच्या एन्ट्रीमुळे निवडणुकीत रंगत वाढणार 

तिरंगी लढत खा. लोखंडेंचे गणित बिघडविणार 
प्रा. डी. के. वैद्य

अकोले – शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सेनेत अस्वस्थता वाढली असून, माजी खा. वाकचौरे यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढला आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांकरवी त्यांना उमेदवारी मागे घेण्याचा सांगावा आला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र वाकचौरे बंड करणारच हे उघड झाले आहे. त्यामुळे ही तिरंगी लढत खा. लोखंडे यांच्या विजयाचे गणित बिघडवणार, हे नक्कीच.

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे. 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात माघारीची शक्‍यता कमीच आहे. अकोले मतदारसंघात गतवेळी खा. सदाशिव लोखंडे याना 64 हजार 573, तर माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना 59 हजार 982 मते मिळाली होती. खा. तर 2009 साली रामदास आठवले यांना 34 हजार 532, तर वाकचौरे यांना 45 हजार 352 मते मिळाली होती. मात्र वाकचौरे यांनी 2014 साली शिवसेनेला ठेंगा दाखविल्याने एकाएकी ‘अलाभ्य लाभ’ होऊन खा लोखंडे यांनी उमेदवारी मिळवली होती व तेरा दिवसांत ते खासदार झाले होते. मात्र त्यानंतर त्यांनी या मतदारसंघात पुन्हा फिरकूनच न पाहिल्याने तोही इतिहास घडवून त्यांनी सामान्य जनतेचा भ्रमनिरास केला. उमेदवारांचा सक्षम पर्याय नसल्याने नाईलाजास्तव शिवसेना नेतृत्वाला ‘मम’ म्हणण्याचा पर्याय स्वीकारावा लागला.

विद्यमान खा. लोखंडे, तर कॉंग्रेस आघाडी कडून आ. भाऊसाहेब कांबळे, तर अपक्ष म्हणून माजी खा. वाकचौरे यांच्यात तिरंगी सामना रंगणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार, हे एवढ्यात स्पष्ट होणार नसले, तरी ‘शेंबी गोंड्या’साठी कोण पुढे कूच करणार? याबाबत मतदारसंघात मतदार राजकीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. निळवंडे बंदिस्त पाइपलाइन व जायकवाडी आवर्तन प्रसंगी त्यांची अगस्ती पूल रात्रीच्या मुक्कामी जमेची बाजू लोखंडे यांना साथ देणार काय? ही औत्सुक्‍य निर्माण करणारी बाब आहे.

गत दोन महिन्यांपासून सेनेच्या कार्यकर्त्यांनीच त्यांचा जो पानउतारा केला, तेवढा खचितच एखाद्या खासदारांचा या पूर्वी झाला असेल. त्यामुळे त्यांना या प्रकरणाची गांभीर्य आता आले असले, तर आता मात्र तेव्हढा वेळ मतदार देतील, ही शक्‍यता जरा कमीच दिसत असून, मतदार आता या तीनही मतदारांची तुलना हटकूनच करणार, हे ओघाने आलेच. त्यामुळे ही दरी बुजविण्याचे मोठे आव्हान खा. लोखंडे पुढे आहे. मागील वेळी दलित आणि मुस्लिम मतदार युती सोबत होते. यावेळी त्यांनी वंचित आघाडी स्थापन करून स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. ही वजाबाकी खा. लोखंडे यांना बरीच मागे घेऊन जाणारी आहे.त्या तुलनेत आ. भाऊसाहेब कांबळे बरे म्हणण्याचा हा बाका प्रसंग म्हणावा लागेल. खरे तर आ. कांबळे हे उमेदवारी घेतच नव्हते.

मात्र माजी. खा. वाकचौरे यांनी नकार दिल्याने त्यांना कॉंग्रेस नेत्यांना रडतराव घोड्यावर बसविण्याचा अनास्था प्रसंग ओढवला आहे.त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी केवळ आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर येऊन पडली आहे. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या चढाओढीच्या राजकारणाने व त्यांच्या स्वपक्ष उमेदवाराशी हाराकीरी करावी लागण्याने आ. कांबळे यांचीही छातीची धड धड वाढली आहे.

राष्ट्रवादीने दक्षिणेत त्यांच्या पुत्राला चांगलाच घाम फोडला आहे. त्यामुळे ते उत्तरेत किती आणि केंव्हा लक्ष देणार, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे.लवकरच याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. यात कामाचा माणूस म्हणून जी छाप माजी खा. वाकचौरे यांनी पाडली आहे. ती या मतदारसंघाच्या कायम लक्षात राहणारी अशी ठरली आहे. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेसची उमेदवारी जाणीवपूर्वक टाळली, हे येथे लक्षात घेणे महत्वाचे आहे.त्याला मतदारसंघातील मतदार कसा साथ देतो, हे लवकरच समजणार आहे. असे असले तरी सामान्य मतदारांचा कल हा वाकचौरेंकडे झुकणारा आहे, हे विसरता येणार नाही. तरी त्याला उत्तर नगर जिल्ह्यातील मतदार कसे मतदान करतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे राहणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.