जगनमोहन रेड्डी : सत्तेचे स्वप्न पूर्ण होणार?

जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशच्या राजकारणातील महत्त्वाचे राजकीय व्यक्‍तिमत्त्व. कॉंग्रेस पक्षाशी नाते तोडून वायएसआर कॉंग्रेस पक्षाची स्थापना करणाऱ्या रेड्डींनी नऊ वर्षांनी कॉंग्रेसला माफ केले असे जाहीर केले आहे. आपल्या मनात कोणतीही सुडाची अथवा बदल्याची भावना नाही, असे जगनमोहन सांगतात. राजकारणामध्ये दूरदृष्टी असणारे नेतेच अशा प्रकारचा विचार करू शकतात, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

रेड्डी यांनी 2010 मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन करण्याच्या तत्कालीन संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला होता. याच मुद्द्यावरून त्यांनी कॉंग्रेसशी फारकत घेतली होती. यंदा विभाजनानंतर आंध्रात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकांबरोबरच विधानसभेच्या निवडणुकाही पार पडल्या आहेत. यंदा जगनमोहन रेड्डी यांना सत्तेत संधी मिळण्याची अपेक्षा आहे. आंध्र प्रदेशात यावेळी चार प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षांबरोबरच आंध्रातील ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्षही इथल्या राजकारणात महत्त्वाचा आहे. वायआएसआर कॉंग्रेसचे प्रमुख असणाऱ्या जगनमोहन यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी हे कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मात्र त्यांचे अपघाती निधन झाले.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या चार पक्षांना मिळालेल्या मतांची टक्‍केवारी पाहिल्यास कोण किती पाण्यात आहे याचा अंदाज येऊ शकतो. गत लोकसभा निवडणुकीत टीडीपीला 40.8 टक्‍के, वायएसआर कॉंग्रेसला 45.7 आणि भारतीय जनता पक्षाला 7.21 टक्‍के मते मिळाली होती. भाजपा आणि टीडीपी यांचे व्होट शेअरींग हे त्यावेळी विनिंग कॉम्बिनेशन ठरले होते. तथापि, यंदा नायडूंविरोधात अँटी इन्कम्बसी आहे. तसेच त्यांचा पक्ष भाजपासोबतही नाही.

जगनमोहन यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत संपूर्ण आंध्र प्रदेशची पदयात्रा केली आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी 1999-2000 मध्ये व्यवसायाच्या क्षेत्रात एंट्री केली होती. कर्नाटकाजवळील संदूरमध्ये त्यांनी विद्युत निर्मिती कंपनी उभी करून उद्योगजगतातील आपल्या वाटचालीचा श्रीगणेशा केला. साधारण चार वर्षांनी म्हणजे 2004 मध्ये त्यांनी कडप्पा लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी मागणी केली. तोपर्यंत कॉंग्रेसला त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आणि अपेक्षा लक्षात आल्या नव्हत्या. कॉंग्रेसने जगनमोहन यांची मागणी स्वीकारली नाही. पण अखेर 2009 मध्ये जगनमोहन यांनी ही निवडणूूक लढवली आणि कडप्पाचे खासदार म्हणून संसदेत प्रवेश केला. त्याच वर्षी त्यांच्या वडिलांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर रिक्‍त झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर जगनमोहन यांना विराजमान व्हायचे होते. पण कॉंग्रेसने तिथेही त्यांना मोडता घातला आणि के. रोसैय्या यांना मुख्यमंत्री बनवले. यामुळे नाराज झालेले जगनमोहन सोनिया गांधींनाही भेटले; पण त्यातून काही हाताशी लागले नाही. अखेर त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.