नगरसेवक, अभियंत्यांना करोना झाल्याने निर्णय
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका भवनामध्ये सामान्य नागरिक व ठेकेदार यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. महापालिकेतील स्थापत्य विभागातील अभियंता, नगरसेवक व आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेतच करोनाचा शिरकाव झाल्याने 30 जूनपर्यंत नागरिक व ठेकेदारांना पूर्णत: प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश काढला आहे.
नागरिकांनी महापालिकेशी संबंधित कामकाजाकरिता दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ईमेल, व्हॉट्सऍपचा वापर करावा. ते ग्राह्य धरून प्रश्नांचे निराकरण करण्यात येईल. लॉकडाऊनच्या काळामध्ये नागरिकांना एप्रिल व मे या दोन महिन्यांत महापालिकेत प्रवेश बंद होता. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत 27 मे पासून नागरिकांना दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवेश दिला जात होता. त्यानंतर 13 जूनपासून अपरिहार्य काम असेल तर विभागातील अधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी घेऊन दुपारी चार ते सहा या वेळेत प्रवेश दिला जात होता. मात्र आता नागरिक व ठेकेदार यांना प्रवेश दिला जाणार नाही.
तसेच नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसोबत केवळ एकाच व्यक्तीला अथवा कार्यकर्त्याला महापालिकेत प्रवेश दिला जाणार आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांनाच करोनाची लागण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून 30 जूनपर्यंत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात म्हटले आहे.