येरवडा, दि.24 (प्रतिनिधी) -क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याची एकाने धमकी दिल्याने येरवडा क्षेत्रीय कार्यालयात येण्यास सर्वच नागरिकांना बंदी घालण्यात आली. कार्यालयाचे गेट बंद करण्यात आले. सरकारी सुट्टी नसतानाही आज क्षेत्रीय कार्यालयास अघोषित सुट्टी जाहीर करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
येरवडा क्षेत्रीय कार्यालय असणाऱ्या या इमारतीमध्ये जन्म-मृत्यू कार्यालय, विवाह नोंदणी कार्यालय, आधार कार्ड नोंदणी, निवडणूक कार्यालय,समाज विकास तसेच रेशनिंग परीमंडळ तसेच पोलीस उपायुक्त परीमंडळ-4 चे कार्यालय असून दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ याठिकाणी असते.धानोरी, कळस, विश्रांतवाडी, येरवडा येथील नागरिक याठिकाणी येत असतात. मात्र, बुधवारी सकाळपासुनच याठिकाणी बाहेरील नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आला होता. कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र, कार्यालयात कोणालाही सोडण्यात येत नव्हते. या इमारतीमध्ये काम करणारे कर्मचारी वगळता इतरांना प्रवेशद्वारावरूनच माघारी पाठवले जात होते. एक इसम एका संस्थेत काम करत असून त्या संस्थेतील इतर कर्मचारी त्याला त्रास देत असल्याने त्याची तक्रार त्याने पोलिसांकडे केली होती. यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने परीमंडळ 4च्या पोलीस उपायुक्तांना इका इसमाने तो आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेण्याऐवजी क्षेत्रीय कार्यालय प्रशासनाने कोणाही बाहेरच्या व्यक्तीला साडू नये, अशा सूचना केल्या.
क्षेत्रीय कार्यालयात एक जण आत्महत्या करणार असल्याची बाब पोलीस यंत्रणेला कळविली होती. त्यानुसार पोलिसांकडून सूचना करण्यात आल्याने क्षेत्रीय कार्यालयात सर्वच नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आला. पोलीस प्रशासनाची सूचना आम्ही पाळली.
– वैभव कडलख, सहायक आयुक्त, येरवडा क्षेत्रीय कार्यालय