विश्रांतवाडी, दि. 24 (प्रतिनिधी) -दुय्यम निबंधक कार्यालयात (हवेली क्र.8) तुकडेबंदी कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करून कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यावर देखील रात्री उशिरापर्यंत खरेदीदस्त नोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कार्यालयाचे प्रभारी दुय्यम निबंधक अमित अविनाश राऊत (रा. पिंपरी) यांनी वैयक्तिक आर्थिक लाभाकरिता दि. 8 ऑगस्ट 2022ला एका दिवसात 24 दस्त नोंदणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. नोंदणी महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी याप्रकरणी चौकशी केली असून अमित राऊत यांना निलंबीत करण्यात यावे, असा प्रस्ताव नोंदणी महानिरीक्षक व मुंद्राक उपनियंत्रक, पुणे विभाग यांच्याकडे पाठविला आहे.
विश्रांतवाडी येथील (हवेली क्र.8) कार्यालयात वरिष्ठ लिपिक अमित राऊत हे प्रभारी दुय्यम निबंधक म्हणून कार्यभार सांभाळत होते. राऊत यांनी तुकडेबंदी कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करीत एका दिवसात 24 दस्त नोंदणी केल्याचे समोर आले आहे. याबाबत नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी दस्ताची तपासणी करण्याचे आदेश सह जिल्हा निबंधक अनिल पारखे यांना दिले होते. यानंतर झालेल्या चौकशीत अमित राऊत यांनी वाघोली, वडकी, तळेरानवाडी, केसनंद, लोणीकंद आदी ठिकाणच्या जागेची बेकायदेशीर नोंदणी केल्याचे उघड झाले. दस्त तपासणीत 8 परिच्छेदांमध्ये 13 लाख 44 हजार 900 रुपये कमी शुल्क आकारल्याचे निदर्शनास आले आहे. जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध असताना शेती व ना-विकास झोनचे दाखले दस्ताला जोडण्यात आले आहेत. नियम भंग करून दस्त नोंदणी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. राऊत यांना निलंबित करून त्यांची तपासणी करण्यात यावी, असा अहवाल सह जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी नोंदणी महानिरीक्षक व नोंदणी उपमहानिरीक्षक यांना पाठविला आहे.
या प्रकरणाबाबतचा सह जिल्हा निबंधक कार्यालयाकडून अहवाल प्राप्त झाला असून त्याची तपासणी करण्यात आली आहे. सदर प्रकरणी संबंधितावर पुढील कारवाई करण्याबाबत नोंदणी महानिरीक्षक कार्यालयास अहवाल सादर केला आहे.
– दीपक सोनवणे, नोंदणी उपमहानिरीक्षक