येरवडा, दि. 24 (प्रतिनिधी) -आळंदी रोड येथील विश्रांतवाडीजवळ असलेल्या संरक्षण, संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) संशोधन व विकास आस्थापना अभियंता (आर ऍन्ड डीई) परिसरात मंगळवारी (दि.23) पहाटेच्या सुमारास बिबट्या दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर याची तत्काळ दखल घेत वनपरिक्षेत्राचे पथक आणि रेस्क्यू ट्रस्ट टिमने या संपूर्ण परीसराची पाहणी करून बिबट्याचा शोध सुरू ठेवला आहे. बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात असून सनियंत्रण करण्याचे दृष्टीने कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आला आहे.
बिबट्याचा वावर आढळलेल्या परीसरात जवळपास 20 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच बिबट्याचा शोध घेण्यासाठी थर्मल कॅमेरे असलेले ड्रोन देखील वापरण्यात येत आहेत. वनविभागाचे कॅमेरे याठिकाणी चालत नसल्याने आर ऍन्ड डीई ने वनविभागाल त्यांचे ड्रोन कॅमेरे दिले आहेत. त्याद्वारे बिबट्याचा शोध सुरू आहे.
आर ऍन्ड डीईच्या जवळ ग्रेफ सेंटर आणि बॉंबे इंजिनियरिंग ग्रुपची ट्रेनिंग बटालियनचा परिसर जवळपास 300 ते 400 एकर आहे, त्या जवळच चऱ्होली आणि धानोरी हद्दीत वनविभागाचीही जागा आहे. हा संपूर्ण परीसर दाट झाडीने व्यापलेला असल्याने या बाजूने बिबट्या अन्नाच्या शोधात या भागात आला असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. शेकडो एकरावर दाट झाडी असलेला परीसर आणि अनेक इमारती असलेला भाग असल्याने बिबट्याचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत. मात्र, वनविभागाकडून शोध घेण्याचे काम सुरू आहे.
आळंदी रस्त्यावरील लष्करी आस्थापनात प्राणी दिसण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, दिघी परिसरात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या ट्रेनिंग बटालियन-2 आणि भारतीय लष्कराच्या केंद्राजवळ बिबट्या दिसला होता.
या वर्षाच्या सुरुवातीला चाकण येथील मर्सिडीज बेंझ प्लांटमध्ये आणखी एक बिबट्या घुसला होता. या विभागालगत मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच बिबट्या दिसल्यास तत्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. किंवा नजीकच्या वनपरिक्षेत्र कार्यालयास कळवावे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले आहे.