राष्ट्रवादीसाठी शहरात अपेक्षित परिस्थिती नसतानाही भोसरी वगळता चिंचवड आणि पिंपरीमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. पिंपरीतून सात, चिंचवडमधून सहा तर भोसरीतून चार जणांनी निवडणूक लढविण्याची पक्षाकडे इच्छा व्यक्त केली होती.
यातून काही नावे वगळण्यात आली असून चिंचवडमधून मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर आणि प्रशांत शितोळे यांच्यात स्पर्धा सुरू असून या तिघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. पिंपरी मतदारसंघातून माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, माजी आमदार अण्णा बनसोडे व नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत यांच्यापैकी एकाचे नाव उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीपुढे सर्वाधिक पेच हा भोसरी मतदारसंघात असून माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी जोरदार तयारी केली असली तरी माजी आमदार विलास लांडे यांनी मैदानात उतरावे अशी पक्षातील वरिष्ठांची इच्छा आहे. मात्र लांडे आपले पत्ते ओपन करण्यास तयार नाहीत. उद्या सायंकाळपर्यंत परिस्थिती अशीच रहिल्यास भोसरीचा उमेदवार गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता असून साने किंवा नगररसेवक अजित गव्हाणे यांच्यापैकी कुणा एकाला मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे.
वंचित, एमआयएमचेही उमेदवार जाहीर
वंचित बहुजन आघाडीने पिंपरी विधानसभेसाठी मंगळवारी प्रविण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. तर भोसरी विधानसभेसाठी शहानवाज शेख यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे. एमआयएमने चिंचवड विधानसभेसाठी जावेद शेख यांना मैदानात उतरविले आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आज घोषणा
राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची निश्चिती झाली असून बुधवारी (दि.2) घोषणा केली जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली. पक्षांत इच्छुकांची संख्या मोठी असून निवडून येणारा उमेदवार हा निकष ठरवूनच उमेदवारी देण्यात येणार असल्याचे थोडासा उशीर झाल्याचे वाघेरे यांनी सांगितले.