Maharashtra Politics – राज्यातील राजकारण दररोज नवनवीन वळणे घेत आहे. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू आहे. या भेटी मागील कारण मात्र, अद्याप गुलदस्त्यात असून विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. याच अनुषंगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी यांनी मुंबई येऊन भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
असे असतानाच महायुतीतील घटकपक्ष असलेला शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासोबत आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपावर एकमत व्हावे या अनुषंगाने चर्चा केली जात आहे. नड़्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे या दोन नेत्यांची बंद दाराआड चर्चा झाली. ही भेट राजकीय विश्लेषकांचे लक्ष वेधून घेत आहे.