वाघोली (प्रतिनिधी) : पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्या प्रयत्नातून व ग्रामस्थ यांच्या सूचनेनुसार पुणे नगर रस्त्यावरील वाघोली मधील अवजड वाहतुकीला ठराविक काळासाठी वेळ दिल्याने नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी मुक्त परिसर पहावयास मिळत असून नागरिकांकडून पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या आभार मानण्यात येत आहे.
पुणे नगर रोड व वाघोली परीसरात रोज मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे. तसेच अवजड वाहनांमुळे रस्त्यावरील जागा मोठया प्रमाणावर व्यापली जाऊन वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. यामुळे नागरिकांना मोठा धोका व गैरसोय होते.
याचा विचार करून पुणे नगर रोड व वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून पोलीस उप-आयुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी जड वाहनांचे वाहतूकी संदर्भात तात्पुरत्या स्वरुपात प्रायोगीक तत्वावर सकाळी ७.०० वा पासून ते सकाळी १०. ०० वाजे पर्यंत व संध्या.०५.०० वा.पासून ते संध्या.०९.०० वा पर्यंत अवजड वाहतूक करणे व पार्किंग बंदी घालण्यात आली आहे.
यामुळे पुणे नगर रोड वाघेश्वर चौक, वाघोली ते खराडी बायपास केसनंद रोड,वाघोली ते शिवाजी महाराज चौक केसनंद गांव, लोहगांव वाघोली रोड, लोहगांव चौक, वाघोली ते लोहगांव ते धानोरी मार्गे विश्रांतवाडी, पुणे नगर रोड, वाघेश्वर चौक, वाघोली ते लोणीकंद, या भागातील वाहतूक कोंडी खूप कमी झाली असून रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू असणाऱ्या या उपक्रमामुळे वाहतूक कोंडी दूर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुणे नगर रस्त्यावरील अवजड वाहतुकीला ठराविक वेळ दिल्याने पुणे नगर रस्त्यावरील वाघोली मधील वाहतूक कोंडी दूर होण्यास मोठी मदत झाली असून या उपक्रमाबद्दल पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार ग्रामस्थ मानत आहेत.
संदीप सातव। जिल्हाध्यक्ष, युवा मोर्चा भाजप
वाघोली ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी वाघोली मधील वाहतूक कोंडीची ठिकाणे व कोंडी दूर करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली होती. त्यानुसार केलेल्या बदलांमुळे वाहतूक कोंडीतून मार्ग निघण्यास सुरुवात झाली असून वाघोलीकरांना कोंडी मुक्त प्रवास याचा अनुभव येत आहे.
संपत गाडे । मुख्य समन्वयक, वाहतूक नियंत्रण समिती