Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानचा वध ज्या वाघनखांनी केला. तीच वाघनख भारताला परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ती वाघनखं आता महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. एप्रिल किंवा मे मध्ये वाघनखं महाराष्ट्रात येतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे नोव्हेंबर महिन्यातच राज्यात येणार असल्याचा दावा, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. तर जानेवारीमध्ये आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु होते. मात्र, ब्रिटन सरकारकडून प्रक्रिया सुरु असल्याने याला विलंब झाला आहे. आता एप्रिल किंवा मे महिन्यात वाघनखांचा मुहूर्त ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ही वाघनखे महाराष्ट्रात आणण्याचा राज्यसरकारचा मानस आहे.
शिवाजी महाराजांनी 15 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. अफजलखानाच्या वध केल्यानंतर शिवरायांना आदिलशाहीला नामोहरण करण्यासाठी बळ मिळाले होते.
दरम्यान, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला होता, ती वाघनखे ब्रिटनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आग्रही आहे. ती वाघनखे सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अॅल्बर्ट संग्रहालयात आहेत. सर्व काही ठरल्याप्रमाणे घडले तर या वर्षीच ही वाघनखे भारतात परत आणण्यात येतील, असे सुधीर मुनगंटीवार होते.