कोथरूड: राज्यात चर्चेत असलेल्या कोथरूड मतदारसंघातील भाजपा सेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांची कोथरूड येथील पी जोग शाळेतील मतदान केंद्रावर समोरासमोर भेट झाली. दरम्यान, या दोन विरोधी उमेदवारांमध्ये रंगलेल्या गप्पांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
निवडणूक प्रचार दरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या दोघांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारून शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिंदे यांना भाजप मध्ये येण्याची ऑफर दिली. त्यावर शिंदे यांनी भाजप मधील निष्ठावंतांना न्याय द्या! मी मनसे मध्येच ठीक आहे, असे म्हणत विषय टाळला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठयाप्रमाणात नेत्यांची आयात झाली. थेट मतदानाच्या दिवशीच चंद्रकांत पाटील यांनी किशोर शिंदेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदेनी देखील आधी भाजपमधील निष्ठावंतांबाबत विचार करा, असे उत्तर पाटलांना दिले.