कर्जमाफी इतकीच नुकसान भरपाई; मुलींच्या विवाहाचा खर्च करणार- चंद्रकांत पाटील

पूर बाधितांसाठी आणखी 20 गावात तात्पुरत्या घरांची निर्मिती

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील 20 पूरग्रस्त गावांमध्ये तात्पुरती घरं बांधून दिली जातील. त्याशिवाय लोकसहभागातून आणि मदतीतून पडलेली घरं देखील बांधून दिली जातील. पूर रेषेत नसणाऱ्या घरांसाठी शासनामार्फत मदत दिली जाईल. तसेच सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यातील या वर्षात होणाऱ्या पूरग्रस्त गावातील मुलींच्या विवाहाचा खर्च आपण वैयक्तिक उचलणार असल्याची घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

शिरोळ तालुक्यातील राजापूर येथे सिध्दगिरी गुरुकुल फौंडेशन व चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून पूर बाधितांसाठी निवारा शेड बांधण्यात आलेल्या श्री सिध्दगिरी नगरचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज झाला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कणेरी मठाचे मठाधिपती काडसिध्देश्वर महाराज, आमदार उल्हास पाटील, माजी खासदार निवेदिता माने, श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाटगे, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, जयंसिगपूरच्या नगराध्यक्ष डॉ. निता माने, अशोक माने, भवानसिंह घोडपडे, मुकूंद गावडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली दोन्ही जिल्ह्यातील 4 लाख 53 हजार पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्यासाठी वायुदल, नौदल, लष्कर, तटरक्षक दल या सर्वांना पाचारण करण्यात आले होते. हेलिकॉप्टरच्या 140 फेऱ्यांमधून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना मदत देण्यात आली. 3 लाखांपेक्षा जास्त लोकांची शिबिरांमध्ये सोय करण्यात आली. 5 हजार रुपये रोख मदत वाटण्यात आली. तर उर्वरित मदत बँकेत जमा करण्यात आली. 20 किलो धान्य वाटप तात्काळ सुरु करण्यात आले.

ज्या आपत्तीग्रस्तांची घरे पूर रेषेत नाहीत आणि ती पूर्ण पडलेली आहेत अशांना ग्रामीण भागासाठी अडीच लाख व शहरी भागासाठी साडेतीन लाख रुपये मदत देण्यात येत आहे. ती घरे बांधून होईपर्यंत त्यांच्या राहण्याची सोय तात्पुरती निवारा शेडमध्ये करण्यात येत आहे. त्याशिवाय त्यांना घर भाडे म्हणून 24 हजारांची मदतही दिली जाणार आहे. अशी तात्पुरती घरे तालुक्यातील आणखी 20 गावांमध्ये उभी केली जातील. त्यासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करुन द्यावी, असेही ते म्हणाले.

पूर रेषेतील पूर्ण पडलेल्या घरांचे बांधकामही लोकांच्या मदतीतून केले जाईल, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, ज्या आपत्तीग्रस्तांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे. त्याशिवाय ज्यांनी कर्ज काढले नाही, अशांना कर्जमाफी इतकीच नुकसान भरपाई देण्याचा विचार आहे. नुकसान झालेल्या मंदिरांचे बांधकाम पश्चिम देवस्थान समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ज्या गावांमधील तालमिंची हानी झाली आहे, त्याची दुरुस्ती आमदार महेश लांडगे हे करुन देणार आहेत.

पडझड झालेल्या शाळांची दुरुस्ती आपदा या मदत खात्यातून केली जाणार आहे. त्याशिवाय सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील आपत्तीग्रस्त गावात ज्या मुलींचे विवाह या वर्षभरात ठरतील, त्या विवाहाचा सर्व खर्च आपण वैयक्तिक करणार असल्याची घोषणा पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केली. त्‍यासाठी विवाहाच्या खर्चाची यादी त्यांनी स्वामीजींच्याडे द्यावी, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बाधितांना तात्पुरत्या घरांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच संजय पाटील यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. या लोकार्पण सोहळ्याला परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.