वडगाव मावळ – मराठा आरक्षणासाठी कमालीचे आग्रही असलेले मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने मराठा समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्षे दिल्या जाणार्या लढ्याला यश आल्याने मावळ तालुक्यात ठिकठिकाणी गुलाल उधळून, पेढे वाटून हा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मावळ तालुक्यात मराठा समाजाचा उत्साह ओसांडून वाहताना दिसत आहे.
वडगावमध्ये मराठा आरक्षणाची विजयी मिरवणूक
मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याबद्दल आपल्या मावळ तालुका सकल समाजाच्या वतीने वडगाव शहरातील मुख्य बाजारपेठेतून विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मावळ तालुका सकल समाजाचे पदाधिकारी, सर्व पक्षीय कार्यकर्ते तसेच मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका आणि महिला भगिनी उपस्थित होत्या. वडगाव शहरातील समस्त मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे यांचे अभिनंदन केले व आभार मानण्यात आले.
परतणार्या आंदोलकांचे लोणावळ्यात चिक्कीने तोंड गोड
लोणावळा, दि. 28 (वार्ताहर) – लोणावळा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाज लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण यांच्या वतीने गुलालाची उधळण करत, फटाक्यांची आतिषबाजी करत व डीजेच्या तालावर नाचत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान सकाळ पासूनच मराठा आंदोलकांनी परतीचा प्रवास सुरू केल्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह द्रुतगती महार्गावर वाहनांची गर्दी झाली होती. दोन्ही महामार्ग आदोलकांना परतण्यासाठी खुले करण्यात आले होते. लोणावळा शहर व ग्रामीण भागातील मराठा संयोजकांकडून परतणार्या मराठा आंदोलकांसाठी चिक्कीचे वाटप करण्यात आले. द्रूतगती महामार्गावर वलवण गावाच्या हद्दीत लोणावळा व ग्रामीण भागातील मराठा संयोजकांनी मनोज जरांगे पाटील यांची गाडी थांबवून त्यांचा सत्कार केला व अभिनंदन केले यावेळी मराठ्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.