लखनऊ – केंद्रीय तपास यंत्रणेने (CBI) रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी केसी जोशी (indian railway officer k c joshi) यांच्या घरातून 2.61 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जोशी हे ईशान्य रेल्वे, गोरखपूर येथे मुख्य सामग्री अधिकारी म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सायंकाळी एका कंत्राटदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
कंत्राटदाराने सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी तक्रारीत म्हंटेल होते की, त्याची कंपनी ईशान्य रेल्वे (NER) ला उत्पादने आणि सेवा पुरवते. त्यांना तीन ट्रक कंत्राटी पद्धतीने पुरवण्याचे कंत्राट मिळाले होते. यासाठी त्यांना प्रति ट्रक प्रति महिना 80 हजार रुपये मिळणार होते. याकामाठी जोशी यांनी कंत्राटदाराकडे 7 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र कंत्राटदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत सीबीआयकडे तक्रार दाखल केली.
सीबीआयने सापळा रचून जोशीला पकडले –
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जोशी यांनी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GEAM) वेबसाइटवरून कंत्राटदाराच्या फर्मची नोंदणी रद्द करण्याची आणि करार संपुष्टात आणण्याची धमकी देऊन 7 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप कंत्राटदाराने केला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाने या आरोपाची पडताळणी करून सापळा रचला. तपासात जोशी दोषी आढळले. त्यांनी कंत्राटदाराकडून 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. यानंतर जोशी यांच्या गोरखपूर आणि नोएडा येथील घरांची झडती घेतली असता या ठिकाणी सीबीआय अधिकाऱ्यांना 2.61 कोटी रुपयांची रोकड सापडली. ती रक्कम जप्त करण्यात आली आहे. केसी जोशी हे इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिस (IRSS) 1988 बॅचचे अधिकारी आहेत.
आरोपी रेल्वे अधिकाऱ्याला लखनौ न्यायालयात हजर केले हजर –
जोशी यांच्या गोरखपूर येथील निवासस्थानावर काल सीबीआयने छापा टाकला होता. सीबीआयच्या छाप्यादरम्यान जोशी यांच्या घरात पैशाच्या अनेक गोण्या सापडल्या. जोशी यांच्यावर रेल्वे कंत्राटदारांकडून लाच घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने आरोपी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईसाठी रेल्वे अधिकारी केसी जोशी यांना लखनौ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.