NCP Political Crisis: राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहे. शिवसेनेप्रमाणे त्यांच्यात देखील राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कोणाचे यावरुन वाद निर्माण झाला आहे. अशातच शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना अपात्र करा, अशी मागणी राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना पत्र लिहून केली आहे. त्यानंतर अजित पवार गटाने देखील शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र करण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे याचिकेतून केली आहे.
विशेष म्हणजे, राज्यसभा खासदार शरद पवार आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावं याचिकेतून वगळण्यात आली आहेत. राज्यसभेतील शरद पवार वगळता वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. तर, लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांना वगळून श्रीनिवास पाटील, फैजल मोहम्मद यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे.
अजित पवार गटातील खासदार प्रफुल पटेल यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करा अशी शरद पवार गटाने मागणी केली होती. शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत शिष्टमंडळाने राज्यसभा सभापतींची भेट घेत प्रफुल पटेल यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अजितदादा गटानेही प्रत्युत्तर दिल्याचं दिसत आहे. अजित पवार गटानं शरद पवार, सुप्रीया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावं वगळली आहेत. शिंदे गटाची खेळी अजित पवार गटानं पुढे चालवल्याचं दिसत आहे.
ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली होती त्यावेळी शिंदे गटाकडून ठाकरे गटातील आमदार आणि खासदार यांचं सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी शिंदे गटानं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नावं वगळली होती. तीच भूमिका आता अजित पवार गटानं घेतली असून शरद पवार आणि सुप्रीया सुळे यांची नावं टाळली आहेत. मात्र अजित पवार गटाने दिलेल्या या प्रत्युत्तरनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.