ओडिशातील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने शिक्षा म्हणून उठया बस्या करायला लावल्यामुळे ४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जाजपूर जिल्ह्यातील आहे. रुद्र नारायण सेठी हा ओरली येथील सूर्य नारायण नोडल उच्च प्राथमिक शाळेचा विद्यार्थी होता. वर्गाच्या वेळेत शाळेच्या आवारात 10 वर्षीय विद्यार्थ्याला त्याच्या चार मित्रांसोबत खेळताना शिक्षकाने पाहिले.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, शिक्षकाने चार विद्यार्थ्यांना वर्गात न आल्यामुळे शिक्षा म्हणून सिट-अप म्हणजेच उठया बश्या करण्यास सांगितले. यादरम्यान रुद्र नावाचा मुलगा जमिनीवर पडला. रसूलपूर ब्लॉकजवळील ओरली गावातील रहिवासी असलेल्या त्याच्या पालकांना घटनेची माहिती देण्यात आली. मुलाला त्याच्या कुटुंबीयांनी आणि शिक्षकांनी जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले.
सामुदायिक आरोग्य केंद्रातून, रुद्रला मंगळवारी रात्री कटकच्या एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, रसूलपूर ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर (बीईओ) निलांबर मिश्रा यांनी सांगितले की, ‘त्यांच्याकडे अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार आलेली नाही. आमच्याकडे औपचारिक तक्रार आल्यास आम्ही तपास सुरू करू आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर आवश्यक कारवाई करू’ या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. इतर पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास नकार देत आहे.
या घटनेबाबत कुखिया पोलिस स्टेशनचे आयआयसी श्रीकांत बारिक यांनी सांगितले की, ‘त्यांच्याकडे कोणाकडूनही तक्रार आलेली नाही. मुलाच्या वडिलांनी किंवा शाळेने एफआयआर दाखल केला नाही. त्यामुळे शाळेतील मुलाच्या मृत्यूबाबत आम्ही कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. रसूलपूरचे सहाय्यक गटशिक्षण अधिकारी प्रवंजन पती यांनी शाळेला भेट दिली असून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.’