वाघोली (प्रतिनिधी) -वाघोली (ता. हवेली) ग्रामपंचायतीने दि. 30 मे रोजी ई-निविदाअंतर्गत काढलेली खुली निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी वाघोली, आव्हाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.
वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने दि. 30 मे रोजी बी वन 2020-21 साठी सूचना क्रमांक एक व सूचना क्रमांक दोनच्या निविदाअंतर्गत खुली निविदाबाबत नोटीस काढली आहे. या अंतर्गत दि. 15 मे रोजी दोन वाजेपर्यंत याबाबत ई-निविदाबाबत प्रस्ताव मागवित आहेत. या कामांपैकी बरीचशी कामे यापूर्वी पूर्णत्वास आली असून काही कामे अंशता बाकी आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने काही कामांबाबत मागवलेल्या निविदा बरोबर आहेत. मात्र, काही कामातील निविदा केवळ कागदोपत्री रंगवल्या जात आहेत. जी कामे पाच-सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्णत्वास आली आहेत अथवा या कामांपैकी दहा टक्के भाग शिल्लक असताना देखील मग या ई-निविदा काढण्याचा ग्रामपंचायतीचा हेतू काय? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याबाबत सर्व कार्यकारी मंडळाच्या उपस्थित सूचना क्रमांक एक व क्रमांक दोनमधील सर्व कामांच्या बाबतीत प्रत्यक्ष पंचायत समिती व जिल्हा परिषद पुणे व ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करून या कामांबाबत योग्य तो निर्णय घेणे व तातडीने दि. 30 मेची ई-निविदा रद्द करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी विजय आव्हाळे यांनी जिल्हाधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामस्थांच्या वतीने याप्रकरणी ग्रामपंचायतीकडे तक्रारी आल्या आहेत. वाघोलीत निविदा प्रक्रियेमध्ये काही कामांबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत; मात्र उर्वरित कामांबाबत नागरिकांची काही तक्रार नाही. जरी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असली तरीही वादग्रस्त कामांबाबत ग्रामपंचायत वर्कऑर्डर देणार का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
वाघोली ग्रामपंचायतीच्या निविदा प्रकरणात हवेली गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
-संदीप कोहीनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी