वाघोली – वाघोली येथे गायरान वस्तीत १ किलो ३२९ ग्रॅम गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली असून एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
छकुली राहुल सुकळे (वय २४, रा. वाघोली) असे गांजा बेकायदेशीररित्या विक्रीकरिता बाळगणाऱ्या महिलेचे नाव आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
महिला आरोपी फरार झाल्याची चर्चा –
गांजा प्रकरणातील आरोपी महिला ही लोणीकंद पोलिसांनी तपासकामी हजर राहण्याची नोटीस बजावल्यानंतर सदर महिलेला अटक करण्यात येत असताना हाताचे ठसे घेताना सदर महिला आरोपी पोलीस ठाण्यातून फरार झाल्याची चर्चा पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
“लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री करणाऱ्या आरोपी महिलेला तपासकामी नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.” – कैलास करे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे)