सातारा -शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांना करंजेतील ठेकेदाराने सोमवारी पालिकेच्या दालनात बेदम मारहाण केली. जिल्हा रुग्णालय ते पारंगे चौक या दरम्यानच्या एका कामाच्या ठेक्यावरून करण्यात आलेल्या तक्रारीमुळे ठेकेदाराचा संयम सुटला. त्यामुळे त्याने बांधकाम विभागाच्या केबिनमध्ये फ्रीस्टाईल मारामारी केली. या प्रकाराने पालिकेच्या वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे.
सातारा पालिकेचा कारभार आरोग्य विभागाच्या भ्रष्टाचारामुळे आधीच चर्चेत आहे. उपमुख्याधिकारी संचित धुमाळ आणि सहकाऱ्यांच्या लाच प्रकरणाची धूळ खाली बसते न बसते, तोच बांधकाम विभागात सोमवारी नाट्य घडले. बांधकाम विभागाने सातारा शहरातील रस्ते व गटारांच्या कामांचे ठेके देण्यात आले आहेत. ही कामे 15 मेपूर्वी होणे गरजेचे होते; परंतु काही ठेकेदारांनी पावसाळ्यातही कामे सुरू ठेवल्याने ती पालिका बांधकाम विभागाच्या रडारवर आली. जिल्हा रुग्णालय ते पारंगे चौक या दरम्यान रस्ता व गटाराचे काम निकृष्ट असल्याची तक्रार नरेंद्र पाटील यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडे केली होती. त्यामुळे ठेकेदार गणेश पवार व नरेंद्र पाटील यांच्यात वारंवार खटके उडत होते. पावसामुळे सदरबझार परिसरातील वीज वारंवार गायब होत आहे.
या परिसरातील धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटण्यासंदर्भात अर्ज देण्यासाठी नरेंद्र पाटील सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता पालिकेच्या बांधकाम विभागात आले. तेथे मूळ ठेकेदार आणि उपठेकेदार गणेश पवार आले. ठेकेदार व नरेंद्र पाटील यांची चर्चा सुरू असतानाच गणेश पवारने नरेंद्र पाटलांना मारहाण केली. अचानक झालेल्या या प्रकाराने सारे अवाक् झाले. यावेळी दालनात अभियंता सुधीर चव्हाण, साबळे व प्रभुणे यांनी हस्तक्षेप करून नरेंद्र पाटील यांना बाहेर नेले. पाटील यांना झालेल्या मारहाणीचा पालिका कामगार संघटनेने निषेध केला. याबाबत नरेंद्र पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अनेक संघटनांचे पदाधिकारी पालिकेत आले. निकृष्ट कामांची माहिती देऊनही मुख्याधिकारी संबंधितांना पाठीशी घालत असल्याने भविष्यात कायदा हातात घेण्याची वेळ नागरिकांवर येईल, असा इशारा पाटील यांनी दिला.