नवी दिल्ली: पाठीतील हाडांच्या दुखापतीमुळे भारताचा द्रुतगती गोलंदाज जसप्रित बुमराह याला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागणार आहे. बुमराहने वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतास कसोटी मालिका जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
भारतीय संघात बुमराहच्या जागी उमेश यादवला स्थान देण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ही माहिती देण्यात आली. पहिल्या कसोटीस दिनांक 2 ऑक्टोबरपासून विशाखापट्टणम येथे प्रारंभ होणार आहे. त्यानंतर पुणे (दिनांक 10 ते 14 ऑक्टोबर) व रांची (दिनांक 19 ते 23 ऑक्टोबर) येथे उर्वरित दोन कसोटी सामने होतील. यादवने डिसेंबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर प्रथमच त्याला कसोटी खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याने आतापर्यंत 41 कसोटी सामन्यांमध्ये 119 विकेट्स घेतल्या आहेत.
बुमराहने वेस्ट इंडिज दौऱ्यातील दोन कसोटींमध्ये 13 गडी बाद केले होते. या मालिकेत त्याने कसोटी कारकीर्दीत 50 विकेट्स घेण्याचा टप्पा ओलांडला होता.
पहिल्या कसोटीसाठी भारताचा संघ- विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धीमान साह, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल.