नवी दिल्ली – भरतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च सन्मान समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. माहीती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवर याबाबतची माहीती दिली आहे. दोन पिढ्यांचे मनोरंजन करणारे आणि लाखो जणांना प्रेरणा देणारे दिग्गज अमिताभ बच्चन यांची दादासाहब फाळके पुरस्कारासाठी एकमुखी निवड झाली आहे. हे जाहीर करताना संपूर्ण देश आणि आंतरराष्ट्रीय समुदाय आनंदी आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे ट्विट जावडेकर यांनी केले आहे.
1970 च्या दशकात “जंजीर’, “दीवार’ आणि “शोले’ सारख्या चित्रपटांनी युवा पिढीचे ‘अँग्री यंग मॅन’ बनलेल्या 76 वर्षीय अमिताभ बच्च्न यांची जुन्या चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे. भारतीय चित्रपटात अजूनही आपली ओळख कायम ठेवण्याचे सामर्थ्य अमिताभ यांनी दाखवून दिले आहे. तब्बल 5 दशकांच्या करिअरदर्म्यान अमिताभ यांनी एकापाठोपाठ एक शेकडो संस्मरणीय व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांना चारवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यत आले आहे.