नवी दिल्ली – इराणला गेलेल्या 58 यात्रेकरूंचे पहिले पथक आज गाझियाबाद जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल झाले. वैद्यकीय तज्ञ या प्रवाशांची तपासणी करत आहेत. सी-17 ग्लोबमास्टर या लष्करी विमानाने त्यांना भारतात परत आणले आहे. इराणला करोनाचा जबर तडाखा बसला आहे.
आतापर्यंत इराणमध्ये 237 जणांचा करोना विषाणूच्या बाधेमुळे मृत्यू झाला आहे. तर तब्बल 7 हजार जणांना करोना विषाणूची बाधा झाल्याचे तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे. सी-17 ग्लोबमास्टर या विमानाने गेल्या दोन आठवड्यात दुसऱ्यांदा इराणमधील भारतीयांना मायदेशी परत आनले आहे.
मायदेशी परत आणलेल्या भारतीयांमध्ये 25 पुरुष, 31 महिला आणि 2 बालकांचा समावेश आहे. या विमानातून 529 भारतीयांचे करोना विषाणूच्या चाचणीसाठी लागणारे नमुनेही आणण्यात आले आहेत. इराणमध्ये सुमारे 2 हजार भारतीय रहात आहेत. परत आणलेल्या भारतीयांना हिंडन इथेच विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी इराणमधला भारतीय दूतावास, भारतीय हवाईदल तसेच तिथल्या वैद्यकीय पथकाचे आणि इराणमधल्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
इराणमध्ये अडकलेल्या इतर भारतीयांना मायदेशी आणण्याकरता सरकार प्रयत्न करत आहे, असे जयशंकर यांनी सांगितले. इराणला 14 अधिकारी आणि चार वैद्यकीय कर्मचारी पाठवल्याचे भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर करण कपूर यांनी सांगितले.